केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात बुधवारी व गुरुवारी विविध ३५ कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी ‘बंद’ला सोलापूर शहर व जिल्हय़ात दुसऱ्या दिवशीही संमिश्र प्रतिसाद मिळाला. यंत्रमाग व विडी कामगारांचा गुरुवारी बंदमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यानिमित्ताने होम मैदानावर आयोजित कामगारांच्या महापडाव अभियानास अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही.
४८ तासांच्या या बंदमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपैकी महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. बँकांचे कामकाजही ठप्प होते. त्यामुळे अर्थव्यवहार अक्षरश: ठप्प झाल्याचे दिसून आले. तर पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी बंदमधील ऑटो रिक्षांचा सहभाग काहीसा शिथिल झाल्याचे पाहावयास मिळाले. गुरुवारी यंत्रमाग व विडी कामगारांचा बंदमध्ये चांगला प्रतिसाद लाभला. बंद काळात होम मैदानावर यंत्रमाग व विडी कामगारांना एकत्र करून महापडाव अभियान हाती घेण्यात आले होते. त्यासाठी सिटूचे नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी पुढाकार घेतला होता. आडम मास्तर यांनी या महापडाव अभियानात सुमारे एक लाख कामगारांचा सहभाग राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात सुमारे चार हजारांएवढेच कामगार एकत्र आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.