भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ते पंतप्रधान.. नरेंद्र मोदींचा हा प्रवास विलक्षण असाच. तीनदा गुजरातचे मुख्यमंत्रिपद ते पंतप्रधानपद या राजकीय प्रवासामुळे नरेंद्र मोदींच्या नावाभोवती एक वलय निर्माण झाले आहे. त्यामुळेच नमो नमोचा गजर देशभरात सुरू आहे. अगदी शालेय साहित्यापासून ते वस्त्रप्रावरणापर्यंत नमो नामाचे ब्रॅण्डिंग झाले आहे. या पाश्र्वभूमीवर आता नमो अ‍ॅण्टिव्हायरस बाजारात आला आहे! संगणकाच्या सुरक्षेसाठी या अ‍ॅण्टिव्हायरसची निर्मिती करण्यात आली असून तो मोफत उपलब्ध आहे. संगणकातील व्हायरसांचा निपात करण्यासाठी इनोवेझिऑन या कंपनीने हा नमो नावाचा अ‍ॅण्टिव्हायरस बाजारात आणला आहे. या अ‍ॅण्टिव्हायरसमुळे संगणकाला व्हायरसच्या हल्ल्यांपासून रोखणे शक्य होणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या व्हर्जनमध्ये संगणकासाठीची प्राथमिक सुरक्षा देण्यात आली आहे. लवकरच याचे अ‍ॅडव्हान्स व्हर्जन बाजारात येणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. विंडोज संगणकांबरोबरच अ‍ॅपलच्या मॅक संगणकांवरही हा अ‍ॅण्टिव्हायरस प्रभावीपणे काम करू शकणार आहे. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा इंटरनेट वापरकर्त्यांचा देश आहे. पण देशातील केवळ १३ टक्केच लोक अधिकृत अ‍ॅण्टिव्हायरसचा वापर करतात. तर ३० टक्के लोक ट्रायल व्हर्जनवर समाधान मानतात. देशातील ५७ टक्के संगणकांवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसते किंवा ते माहिती नसलेले सुरक्षा कवच वापरत असावेत असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गंगनेजा यांनी स्पष्ट केले.
नाव असे सुचले
देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण होते. सर्वत्र नरेंद्र मोदींच्या नावाचा बोलबाला होता. देशातील भ्रष्टाचार दूर करून कल्याणकारी राज्य आणण्याचा नरेंद्र मोदींचा संकल्प होता. त्यांना अभिनंदन करून त्यांच्याकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत, हा संदेश देण्याच्या उद्देशाने अ‍ॅण्टिव्हायरसला नमो नाव देण्याचे सुचले असे अभिषेक गंगनेजा म्हणाले. आमच्या कंपनीचा इतर व्यवसाय चांगला सुरू असून कंपनीला अपेक्षित नफा होत आहे. यामुळेच हा अ‍ॅण्टिव्हायरस मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याचेही ते सांगतात.