जिल्हा नियोजन समितीची निवडणूक
अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदासाठी येत्या १३ मार्चला होत असलेली निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असून, सदस्यपदासाठी इच्छुकांची गर्दी झाल्याने त्यांच्या आकांक्षांना आवर घालण्याची पाळी राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांवर आली आहे.
जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद, महापालिका आणि नगर परिषदांच्या सदस्यांमधून ४० जागा आहेत. सर्वाधिक २१ सदस्य जिल्हा परिषदेतून निवडले जाणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुरुवातीला प्रयत्न करण्यात आले, पण प्रहार, बसप, विदर्भ जनसंग्राम आणि अपक्षांनी प्रतिसाद न दिल्याने सत्तारूढ पक्षाच्या पदरी निराशाच आली आहे. जिल्हा परिषदेच्या सत्तारूढ आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर करून सत्ताधाऱ्यांची कोंडी केली आहे. ज्या संवर्गातून जिल्हा परिषद सदस्य निवडला गेला, त्याच संवर्गातून या सर्वाना जिल्हा नियोजन समितीतही नामांकन सादर करणे बंधनकारक असल्याने अनेक दिग्गजांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागणार आहे. आतापर्यंत दोनशेवर सदस्यांनी उमेदवारी अर्ज घेतले असून, हे  अर्ज दाखल करणाऱ्या दिग्गजांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, सभापती महेंद्र गैलवार, मनोहर सुने, प्रताप अभ्यंकर, गिरीश कराळे, मोहन सिंघवी, मोहन पाटील, बापूराव गायकवाड, विनोद डांगे, विनोद केने, चित्रा डहाणे, सरिता मकेश्वर, शिवसेनेचे सुधीर सुर्यवंशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयप्रकाश पटेल, सदाशिव खडके, राष्ट्रवादीचे श्रीपाल पाल, तसेच रवींद्र मुंदे, अभिजित ढेपे यांचा समावेश आहे. नगर परिषद सदस्यांपैकी राजेंद्र लोहिया, पवन बुंदेले, दीपाली विधळे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार असले, तरी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळल्याचे सांगण्यात येत आहे. मतदान झाल्यास जिल्हा परिषदेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात विदर्भ जनसंग्राम, प्रहार आणि बसप यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. जिल्हा परिषदेत सर्वाधिक रस्सीखेच आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमने-सामने आहेत. सत्तारूढ आघाडीला आपले अस्तित्व दाखवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. महापालिकेत मात्र सध्या सामसूम आहे, महापालिकेतून निवडल्या जाणाऱ्या सदस्यांविषयी सामोपचाराने मार्ग काढण्याचे प्रयत्न विविध राजकीय पक्षांकडून सुरू झाले आहेत. जिल्हा नियोजन समितीवर ४० सदस्य निवडले जाणार आहेत. त्यात ५० टक्के म्हणजे महिलांची संख्या २० राहणार आहे. महिलांची संख्या वाढणार असल्याने पुरुषांमध्ये चुरस आहे. राजकीय पक्षांनी ‘थांबा आणि वाट पहा’ अशी भूमिका घेतल्याने इच्छुक सदस्यांमध्ये अस्वस्थता आहे. कुणाला थांबायला सांगितले जाते, प्रहार, बसप, विदर्भ जनसंग्राम आणि अपक्षांची भूमिका ऐनवेळी काय ठरते, यावर या निवडणुकीचे चित्र अवलंबून असणार आहे. गुरुवापर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत, १५ फेब्रुवारीला छाननी होईल आणि त्यानंतर २५ तारखेला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.