अन्नसुरक्षा व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य या केंद्र व राज्य सरकारच्या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजनांची जिल्हय़ातील सुरुवातच अडखळती झाली आहे. योजनांमध्ये कशी लबाडी सुरू आहे, याची उदाहरणे खुद्द पालकमंत्री मधुकर पिचड यांनीच बैठकीत सादर करत असे बेभरवशाचे काम आपल्याला मान्य नाही या शब्दांत अधिका-यांना खडसावले. जिल्हाधिकाऱ-यांनीही प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्याची आवश्यकता असल्याची कबुली दिली.
निवडणुका असल्याने दोन्ही योजनांमध्ये तक्रारींना मोठा वाव राहील. योजनांतील अपात्र लोकांना शोधा, पात्र लोकांना संधी द्या. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दरमहा दोन्ही योजनांचा आढावा घ्यावा. तक्रारींना संधी ठेवू नका, प्रभावी अंमलबजावणी करा असे पिचड यांनी सांगितले.
दोन्ही योजनांचा आढावा घेण्यासाठी आज दुपारी नियोजन भवनात झालेल्या बैठकीत पिचड बोलत होते. आ. चंद्रशेखर घुले, जि.प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल तसेच अधिकारी उपस्थित होते.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हय़ात ८ लाख लाभार्थी आहेत, मात्र केवळ १ लाख ५ हजार जणांना कार्ड वाटप झाले. जे कार्ड लोकांना मिळाले त्यावर हॉस्पिटलची नावे नाहीत. अकोले, पाथर्डी व कर्जत या ठिकाणी हॉस्पिटलची नियुक्तीच झाली नाही. उर्वरित २६ रुग्णालये आहेत, ती सी ग्रेडची आहेत. अनेक कार्डवर रुग्णालयांची नावे नाहीत, तरीही जिल्हय़ात तब्बल ६ कोटी रुपये खर्च झाले आदी बाबी निदर्शनास आल्या. कार्ड मिळले नसेल तर रेशन कार्डवर योजना राबवा, प्रत्येक दवाखान्याबाहेर फलक लावा, आदी सूचना पिचड यांनी केल्या.
अन्नसुरक्षा योजनेतही राहाता, कर्जत, जामखेड, शेवगाव वगळता इतर कोणत्याही तालुक्यात लाभार्थीच्या याद्या तयार नसल्याची माहिती उघड झाली. दरमहा २ लाख ३१ हजार पैकी केवळ ५० हजार मेट्रिक टन धान्याचे वाटप होते आहे, स्वस्त धान्य दुकानदारांच्या १२ दिवसांच्या संपामुळे अनेक ठिकाणी धान्य पोहोचले नाही यासह अनेक तक्रारी बैठकीतच निदर्शनास आल्या. सर्व दुकानांत दि. २५ पर्यंत योजनेचे धान्य पोहोच झाले पाहिजे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
पालकमंत्री पिचड यांचे आक्षेप
– स्वस्त धान्य दुकानातील धान्य बाजारात कसे विकले जाते?
– अकोले तालुक्यात एकाचीच १८ रॉकेल दुकान परवान्यासाठी मागणी
– दूध संघाच्या संचालकाला बीपीएलचे कार्ड कसे मंजूर झाले? शिवाय त्याचे
   वाटपही आपल्याच हस्ते ठेवले. लक्षात आल्यावर ते रद्द केले.

– साखर कारखान्यातील कायम कामगारांना बीपीएलचे कार्ड कसे?