शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, याकरिता शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने महालक्ष्मी मंदिरामध्ये दंडवत घालण्यात आले, तर महिला समितीच्या वतीने गणेश मंदिरात मंत्रजप करण्यात आला.
 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती बिघडली असल्याचे ऐकून शिवसैनिक अस्वस्थ झाले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे समजल्यावर आज शिवसैनिकांच्या चेहऱ्यावरील निराशा दूर झाली होती. तरीही ठाकरे हे पूर्वीप्रमाणेच ठणठणीत बरे व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करीत होते. याकरिता शुक्रवारी दंडवत व मंत्रजपाचे आयोजन करण्यात आले होते. महालक्ष्मी मंदिरात जमलेल्या शिवसैनिकांनी महालक्ष्मीच्या चरणी सेनाप्रमुखांच्या प्रकृतीत सुधारणा होवो अशी प्रार्थना केली. त्यानंतर मंदिर परिसरात दंडवत घालण्यात आले. यामध्ये कमलाकर किलकिले, विजय देसाई, रघुनाथ शिपुगडे, रेणुराज मांडवलकर, आनंद मिरजकर, विष्णू पवार यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.    दरम्यान, सायंकाळी ओढय़ाचा गणपती मंदिरात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मंत्रजप केला. ‘ओम गं गणपतये नम:’ या मंत्राचा ११ हजार १११ वेळा मंत्रजप करण्यात आला. ठाकरे यांच्या स्वास्थ्याकरिता प्रार्थना करण्यात आली. यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी वैशाली क्षीरसागर, सारिका मिरजकर, पूजा कामते, पूजा भोर, सोनाली पेडणेकर, विकास भालेराव, दीपक चव्हाण आदींचा सहभाग होता.