आयुष्याची पुंजी पणाला लावून कुटुंबीयांकडून घराची खरेदी केली जाते. अशा स्थितीत सदनिकाधारकांची फसवणूक होऊ नये, यासाठी केंद्र शासनाप्रमाणेच राज्य शासनानेही नियमावली तयार केली आहे. यामुळे या पुढील काळात घरकुल घेणा-यांची फसवणूक टळली जाणार आहे, असे मत कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी बांधकाम विषयक कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामावर काम करणारा कामगार नोंदणीकृत आहे का याची तपासणी करावी. नोंदणीकृत नसल्यास व्यावसायिक, विकसकस्थापत्य अभियंता यांना नोंदणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.    
इचलकरंजी येथील सुरभी डेव्हलपर्सच्या ‘सनसिटी’ या भव्य गृह प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. भव्य रो बंगले व सदनिकांचा या प्रकल्पामध्ये समावेश असल्याची माहिती विकसक जहीर सौदागर व फिरोज शिकलगार यांनी दिली. क्रेडाई इचलकरंजीचे अध्यक्ष नितीन धूत यांनी क्रेडाईची मान्यता असलेला शहरातील पहिला गृह प्रकल्प असल्याचे सांगितले.    
आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, सामान्यांना परवडतील अशी खरे बांधण्याचा संकल्प नितीन धूत व सहका-यांनी केला असून तो कौतुकास्पद आहे. सौदागर-शिकलगार यांचा अनुभव व क्रेडाईची मान्यता यांमुळे प्रकल्प उत्कृष्ट रीत्या साकारेल. कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, वस्त्रनगरीची वाढ झपाटय़ाने होत असल्याने नजीकच्या भागात वसाहत विस्तारत आहे. सामन्यांचे घर ही संकल्पना साकारण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. या वेळी कोल्हापूर जिल्हा सूतगिरणीचे अध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, महावीर गाट, सतीश डाळ्या, स्वप्नील आवाडे, मदन कारंडे, सरपंच सरदार सुतार यांच्यासह क्रेडाईचे सदस्य उपस्थित होते.