03 August 2020

News Flash

शिवडोह जोडकालवा प्रकल्प मार्गी लागणार

पिंपळगावजोगे कालव्याच्या टेलटँकपासून शिवडोह तलावाच्या जोडकालव्यासाठी जमिनीचे हस्तांतर करून हा प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

| August 10, 2013 01:47 am

पिंपळगावजोगे कालव्याच्या टेलटँकपासून शिवडोह तलावाच्या जोडकालव्यासाठी जमिनीचे हस्तांतर करून हा प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या गेल्या दहा वर्षांच्या संघर्षांला यश आले असून या प्रकल्पामुळे साडेसातशे एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. दरम्यान, तालुक्यातील ४७० हेक्टर जमिनीसाठी आवश्यक असणारे पाणी नियमितपणे देण्याचे आदेशही खंडपीठाने कृष्णा खोरे महामंडळास यापूर्वीच दिले आहेत.
कुकडी प्रकल्पांतर्गत पिंपळगावजोगे धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर देवीभोयरे येथील टेलटँकपर्यंत कालव्याची खोदाई अनेक वर्षे रेंगाळली होती. पुणे जिल्हयातील काही शेतकऱ्यांच्या आठमुठेपणामुळे तालुक्यातील शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत असल्याने तालुक्यातील जनतेने संघर्ष करून हे काम मार्गी लावले. टेलटँकपर्यंत पाणी आल्यानंतर तेथून ७४० मीटर अंतरावर असलेल्या शिवडोह तलावात जोड काल्याव्यादवारे पाणी सोडण्याची योजना होती. मात्र तेथेही काही शेतकऱ्यांनी जमीन हस्तांतरणास विरोध केल्याने हे कामही अनेक वर्षे रेंगाळले होते.
या जोडकालव्यासाठी कामगार नेते शिवाजी औटी यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब दिघे, वसंत मोरे, जयवंत मुळे, शिवाजी बेलोटे, संतोष दिघे, सुखदेव सरडे, दत्ता सुरुडे, कृष्णा करकंडे आदींनी संघर्ष केला. मात्र यश न आल्याने औरंगाबाद खंडपीठात शिवाजी औटी यांनी अडीच वर्षांपूर्वी जनहित याचिका दाखल केली. याच याचिकेदरम्यान खंडपीठाने तालुक्याला हक्काचे पाणी देण्याचे कृष्णा खोरे महामंडळास दोन महिन्यापूर्वी आदेश दिले होते.
या कालव्यासाठी जमिनी देण्यासाठी बहुतेक शेतक-यांनी संमती दिली आहे, ग्रामपंचायतींनीही तशा प्रकारचे ठराव शासनास दिले आहेत. जिल्हाधिका-यांनी सामाजिक हीत लक्षात घेउन जमिनीचे भूसंपादन करावे व हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे वडझिरे, देवीभोयरे, चिंचोली तसेच पिंपरीजलसेन परिसरातील शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण असून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2013 1:47 am

Web Title: shivdoh canal problem will solve
टॅग Solve
Next Stories
1 चिंभळे येथील घटनेच्या सीआयडी चौकशीची मागणी
2 दु:खात बुडाले पिंपळगाव!
3 सांगलीच्या महापौरपदासाठी काँग्रेसच्या कांचन कांबळेचा अर्ज
Just Now!
X