उसाची पहिली उचल जाहीर करावी, या मागणीसाठी राहुरी तालुक्यात शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केल्याने ऊसतोडणीच्या कामावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे तोडणीमजूर ऊसतोडणीऐवजी कापूस वेचण्याचे काम करीत आहेत.
रघुनाथदादा पाटीलप्रणीत शेतकरी संघटनेने उसाला पहिली उचल ३ हजार ५०० रुपये तर खासदार राजू शेट्टी अध्यक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला ३ हजार रुपये पहिली उचल द्यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी ऊसतोडणीचे काम बंद पाडले आहे. शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते हे दुचाकीवर जाऊन तोडणी मजुरांना धमकावत आहेत. तसेच तोडणी करू नका, असे आवाहन करीत आहेत. उसाने भरलेल्या मोटारीच्या हवा सोडून देण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील तोडणीचे काम ठप्प झाले आहे. यंदा जायकवाडीला पाणी गेल्याने शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक घेतले. त्यामुळे आता तोडणीचे काम बंद असल्याने मजूर कापूस वेचणीचे काम करत आहेत. कापूस वेचणीला प्रतिकिलो ५ रुपये दर मिळत आहे. एक मजूर ४० ते ५० किलो कापूस वेचतो. २०० ते २५० रुपये मजुरी मिळते. बसून राहण्यापेक्षा रोजंदारी सुटत असल्याने मजुरांनी कापूस वेचणी सुरू केली आहे.
तालुक्यात ९ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात उसाचे पीक आहे. १५ साखर कारखान्यांनी ऊस नेण्याकरिता तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ३६० मजुरांच्या टोळय़ा व १ हजारहून अधिक टायर बैलगाडय़ा कार्यक्षेत्रात तोडणीसाठी आल्या आहेत. संगमनेर, अशोक, प्रवरा, अगस्ती, कुकडी, संजीवनी, कोळपेवाडी, वृद्धेश्वर, गंगामाई आदी कारखाने ऊस नेत आहेत. प्रसाद शुगर व तनपुरे कारखान्याने ऊसतोड सुरू केली आहे. गळीत हंगामाच्या प्रारंभीच उसाची पळवापळवी सुरू झाली आहे. अद्याप एकाही कारखान्याने भाव जाहीर केलेला नाही. पण शेतकऱ्यांना अन्य कारखान्याच्या तुलनेत सरासरी भाव दिला जाईल, असे आश्वासन दिले जात आहे. सध्या आडसाली उसाची तोड चालू आहे. तसेच काही कारखाने आडसाली उसाचा खोडवा नेत आहे. संगमनेर कारखान्याने उसाचा उतारा चांगला असेल तरच ऊस न्यायला सुरुवात केली आहे. बहुतेक कारखाने पक्व झालेला ऊस नेत आहेत. प्रत्येक गावात ५ ते ६ कारखान्यांच्या तोडणीमजुरांच्या टोळय़ा आल्या आहेत.
तनपुरे कारखान्याने २ हजार २०० रुपये दराने यापूर्वी पैसे दिले असून आणखी २५१ रुपये देण्याचे जाहीर केले आहे. अन्य कारखान्यांच्या बरोबरीने भाव देण्याचे त्यांनी जाहीर केले असल्याने शेतकरी या कारखान्यालाही ऊस देत आहेत. शेतकरी संघटनेने उसाला कोयता लावू देणार नाही, असा इशारा देत आंदोलन सुरू केले असले तरी शेतकरी मात्र कारखान्यांना ऊस देत आहेत. त्यामुळे आता संघटनेने ऊसतोडणी व वाहतूक बंद पाडण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ऊसतोडणी बंद करण्याऐवजी रस्त्यावरील ऊस वाहतूक करणाऱ्या मालमोटारीची हवा सोडून दिली जाते. अद्याप साखर कारखान्यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या नाहीत. मात्र काही कारखान्यांनी मोटारींना संरक्षण द्यावे, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.