प्रजासत्ताकदिनापासून सलग तीन दिवस सुट्टी असल्याने करवीरनगरी पर्यटकांच्या उपस्थितीने गजबजून गेली आहे. महालक्ष्मी मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा, नरसोबाची वाडी या धार्मिक ठिकाणी भाविकांची गर्दी वाढली आहे. ऐतिहासिक पन्हाळा, गगनबावडा येथेही पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
प्रजासत्ताकदिन, ईद व रविवार अशा सलग तीन सुट्टय़ा मिळाल्याने अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. पर्यटनासाठी कोल्हापूर निवडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. देवदर्शनाबरोबरच निसर्गरम्य ठिकाण, ऐतिहासिक स्थळे व मनोरंजन असा संमिश्र अनुभव कोल्हापूर जिल्ह्य़ात मिळत आहे. पर्यटकांच्या व भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे शहरातील यात्रीनिवास व हॉटेल हाऊलफुल्ल झाले आहेत. अन्य पर्यटनस्थळीही अशीच अवस्था आहे. कोल्हापुरात पर्यटक मोठय़ा संख्येने येत असताना जिल्ह्य़ातील पर्यटक मात्र अन्यत्र पर्यटनासाठी जाताना दिसत आहेत. शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर, नाशिक, अक्कलकोट, शेगाव अशा धार्मिक स्थळांना त्यांची पसंती आहे. त्याच्या जोडीलाच पश्चिमेला असलेला कोकण व दक्षिणेला असलेला गोवा हे प्रदेशही त्यांना खुणावत आहेत.

आनंदावर पाणी फेरले
सलग तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातील पर्यटक कोल्हापूरकडे धाव घेत आहेत. मात्र स्थानिक प्रशासन मात्र याबाबतीत नतद्रष्ट असल्याचे पाहावयास मिळत आहे. आजपासून सलग चार दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट झाल्याने पर्यटक व त्यांच्या सेवेसाठी सज्ज असलेल्या लोकांच्या आनंदावर पाणी फेरले आहे. स्थानिक नागरिकांना सुट्टीचा आनंद घेण्याऐवजी पाण्याचा शोध घेण्यासाठी धावपळ करावी लागत होती. टँकरचे पाणी मिळण्यातच त्यांना सुट्टीचा खरा आनंद मिळत होता.