मतदान हे पवित्र राष्ट्रीय कर्तव्य असेल तर याचे पुण्य खारमधील मरियम उमर सय्यद यांच्या पदरात सर्वाधिक असेल. कारण, १११ वर्षांच्या मरियम यांनी भारत स्वतंत्र झाल्यापासून इतके वेळा हे राष्ट्रीय कर्तव्य बजावलं आहे की त्याची गणतीच त्यांना करता येत नाही. येत्या २४ एप्रिलला त्या हे कर्तव्य पुन्हा बजावणार आहेत. यावेळीही त्या मुंबईतील काही मोजक्या ज्येष्ठ मतदारांपैकी एक असतील. मारियम १९७०च्या दशकात गुजरातमधून पती उमर यांच्यासमवेत रोजीरोटीच्या शोधात मुंबईत आल्या. खार स्थानकाबाहेरील बाजारात असलेल्या एका इमारतीत त्यांनी छोटेखानी संसार मांडला. त्यांची संसारवेल पाच मुलगे आणि सहा मुली यांच्या रूपाने फुलली. आता सय्यद कुटुंबाचे तब्बल ५० सदस्य आहेत. ज्या इमारतीत ते राहत होते, ती एका पारशाची होती. कुणी वारसदार नसल्याने त्यांनी ती सय्यद कुटुंबाला विकली. संपूर्ण इमारतीत सय्यद यांचीच मुले-मुली राहतात. तेव्हापासून ही इमारत मारियम यांच्या पतीच्या नावाने ‘उमर मंझिल’ म्हणून ओळखली जाते. धर्मनिरपेक्ष विचारांवर श्रद्धा असलेले सय्यद कुटुंब स्वतंत्र भारतात मतदानाचा हक्क मिळाल्यापासून कायम काँग्रेसच्या पाठीशी उभे आहे. ते राहत असलेला खार स्थानकाजवळील परिसर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. सुनील दत्त राजकारणात आल्यापासून या भागाचे अनभिषिक्त राजकीय नेते राहिले आहेत. त्यामुळे, आपल्या मतदारसंघातील सय्यद कुटुंबियांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले ते प्रिया दत्त यांच्या काळातही कायम आहेत. आजही प्रिया दत्त निवडणुकीच्या निमित्ताने खारच्या या परिसरात प्रचाराकरिता आल्या की उमर मंझिलमध्ये आवर्जून येतात. मरियम यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय त्यांची प्रचारफेरी पूर्ण होत नाही. मरियम यांच्या मुलांपैकी प्रत्येकाचा लहानमोठा व्यवसाय आहे. तर त्यांच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या नातवंडांपैकी काही जण खासगी कंपनीत नोकरीला आहेत. ‘माझी आजी कालपवापर्यंत आपले कपडे स्वत:च्या हाताने धूत असे. दुसऱ्यांनी तिचे काम केलेले तिला खपत नसे,’ असे आपल्या आजीविषयी जावेद सय्यद सांगतात.