येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व एजंट यांच्यात संगनमताव्दारे  चालणा-या गैरव्यवहाराचा बुरखा छायाचित्रे व व्हिडिओ शूटिंगव्दारा फाडूनही तेथील कर्मचा-यांना सुबुध्दी न सुचल्याने अखेर गुरुवारी तेथील कनिष्ठ लिपिक व एजंट अशा दोघांना लाच घेत असताना रंगेहाथ पकडले गेले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्यांची सागर शिंगे व सचिन पाटील अशी नावे आहेत.   
येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी हे एजंटाव्दारे भ्रष्टाचार कशाप्रकारे करतात हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गेल्या चार महिन्यांपासून विविध आंदोलनाव्दारे दाखवून दिले होते. गेल्या महिन्यात तर छायाचित्रे व व्हिडिओ शूटिंग दाखवून त्याचे पुरावेच सादर केले होते. तरीही तेथील एजंटगिरीला आळा बसला नव्हता. त्याबाबत विचारणा केल्यावर अधिका-यांकडून दुरुत्तरे केली जात होती. कार्यालयातील भ्रष्टाचार बिनबोभाटपणे सुरू राहिल्याने भाकपच्या कार्यकर्त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.     
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिक सागर शिंगे व एजंट सचिन पाटील यांनी तक्रारदार शोएब मुजावर (रा.सुभाषनगर) यांच्याकडे मोटारसायकलकरिता हवा असलेला क्रमांक देण्यासाठी १ हजार रुपये लाचेची रक्कम मागितली होती. त्यांनी लाचेची ८०० रुपयांची रक्कम एजंट सचिन पाटील यांना देण्याचे मान्य केले. त्यानुसार गुरुवारी लाचेची रक्कम स्वीकारत असताना कनिष्ठ लिपिक सागर रामचंद्र शिंगे (वय ३० रा.देवकर पाणंद) व सचिन पाटील (वय ३२ रा.पाटोळेवाडी) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली.