आम आदमी पक्षाकडे जिल्ह्य़ातील नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी एकूण २० जणांनी उमेदवारी मागितली आहे, त्यांची निवड प्रक्रिया गुरुवारी (दि. २०) मुंबईत होणार आहे. या दोन्ही जागांसह महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा पक्ष लढवणार आहे. दि. २५ फेब्रुवारीपर्यंत सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले जाणार आहेत.
पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य संजीव साने यांनी ही माहिती दिली. मात्र इच्छुकांची नावे सांगण्यास साने यांनी नकार दिला. नावे जाहीर केल्याने ‘अनेक घोटाळे’ होतात, असे उत्तर त्यांनी दिले. पक्षाचा सभासद नसेल तरी उमेदवारीसाठी अर्ज दाखल करू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. २० पैकी काही अर्ज थेट राज्य व राष्ट्रीय कार्यकारिणीकडेही दाखल झाले आहेत. पक्षाच्या कार्यकारिणीच्या सदस्यांपैकी कोणी उमेदवारी मागितल्यास त्याला निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्य अर्चना मगर यांना दि. २० रोजी निमंत्रित केले गेलेले नाही, असेही साने यांनी सांगितले.
स्वच्छ व पारदर्शी तसेच कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नसलेली व्यक्ती नगर व शिर्डीत उमेदवार दिला जाईल, असा दावाही साने यांनी केला. जिल्ह्य़ात पक्षाचे ६० हजारांवर सभासद झाले आहेत, त्यापैकी सुमारे ४८ हजार जणांचा डाटा पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीकडे उपलब्ध आहे, असाही दावा त्यांनी केला. निवडणुकीसाठी पक्षाला एखाद्या जागेवर योग्य उमेदवार मिळाला नाही तर ती जागा खुली ठेवू असे ते म्हणाले.
जिल्ह्य़ात पक्षाच्या वतीने निवडणूक प्रचार व पक्षाचे चिन्ह मतदारांपुढे जाण्यासाठी आजपासून‘झाडू चलाव यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. नगर शहरात मोटारसायकल रॅलीमुळे यात्रेस पोलिसांनी परवानगी नाकारली, त्यामुळे नगरमध्ये ही यात्रा उद्या, मंगळवारी सकाळपासून पायी सुरू केली जाणार आहे, अशी माहिती साने यांनी दिली. पक्षाचे किरण उपकारे, प्रसाद सैंदाणे, प्रशांत पांडे, हनीफ बागवान, अनिस मन्यार, अॅड. जावेद काझी, डॉ. रजपुत गोपाळ आदी या वेळी उपस्थित होते.
 शेवगाव पालिकेसाठी आंदोलन
शेवगावला नगरपालिका स्थापन व्हावी या मागणीसाठी आम आदमी पक्ष व शेवगाव ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात रोज एका तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शेवगाव ग्रामपंचायतीत कायम कर्मचारी कमी व कंत्राटी कर्मचारी अधिक आहेत. या कंत्राटी कर्मचा-यांना २ हजार वेतन दिल्याच्या सह्य़ा घेतल्या जातात व प्रत्यक्षात ७५० रुपयेच दिले जातात. या कपातीची कोणतीही पावती दिली जात नाही. सन २००१ मध्येच शेवगावला सरकारने पालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी लोकसंख्या ३२ हजार होती, ती आता ४८ हजार झाली आहे. कमी वेतन व वाढती लोकसंख्या यामुळे पाणी, सफाई याकडे दुर्लक्ष होते. आचारसंहितेपूर्वी पालिका स्थापन व्हावी यासाठी पक्षाचे मुंबईतील कार्यकर्ते दि. २८ रोजी नगरविकास व ग्रामविकासमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती संजीव साने यांनी दिली.