पावसाचा जोर रविवारीही कायम राहिला. गेल्या चोवीस तासांत जिल्हय़ात ४४.७ मि.मी.पावसाची नोंद झाली असून ४७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्हय़ातील १२ रस्ते वाहतुकीस बंद झाले आहेत. राधानगरी धरणातून २२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. गेले चार दिवस संततधार सुरू आहे. अहोरात्र पडणाऱ्या पावसाचे परिणाम आता दिसण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच नद्या व धरणातील पाणीसाठा मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. पाण्याखाली जाणाऱ्या बंधाऱ्यांच्या संख्येत पाचने वाढ झाली असून ही संख्या आता ४७ वर येऊन ठेपली आहे. नदीपात्र, ओढे यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने बारा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये वाढ झाल्याने नृसिंहवाडी येथील श्रीदत्त देवस्थानही पाण्याखाली गेले आहे.
कुडित्रे, कोगे, महे, राशीवडे-परिते, उत्तरेश्वर-शिंगणापूर, देसाईवाडी आदी प्रमुख रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. राधानगरी धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तेथून २२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून त्याआधारे वीजनिर्मिती केली जात आहे. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने पंचगंगा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. पिकनिक पॉइंट येथून पूर पाहण्यासाठी सहकुटुंब लोक आले होते. भाजलेली कणसे, शेंगा याचा आस्वाद पावसाच्या सरी अंगावर झेलत घेतला जात होता. घाटावर पाणी आल्याने वाहन धुणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ११४ मि.मी. पाऊस झाला. शाहूवाडी येथे ७४.७७, भुदरगड ७९.४ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे ६ मि.मी. पाऊस पडला होता.