महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता तथा वाघूर पाणी पुरवठा योजनेचे प्रकल्प प्रमुख शशिकांत बोरोले यांच्या विरुद्ध त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शहीद भगतसिंग महापालिका कामगार संघटनेने प्रभारी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. चौकशी समितीने बोरोले यांना  दोषी ठरविले असताना प्रशासन त्यास पाठीशी घालत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. अनिल नाटेकर यांनी हे निवेदन दिले आहे. बोरोले विरुद्ध  विभागीय चौकशी पूर्ण होऊन चौकशी अधिकाऱ्यांनी बोरोलेंविरोधातील आरोपांमध्ये तथ्य असल्याचे अहवालात म्हटले आहे.  विशेष चौकशी अधिकारी एस. एम. वैद्य यांनी बोरोले विरुद्ध वाघूर पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक पाचमध्ये सुमारे २० कोटी रुपयांची वसुली दाखविल्याचे स्पष्ट आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी ३१ ऑगस्ट २०१२ रोजीच महापालिका आयुक्तांना हा अहवाल सादर केला. त्यात  बोरोले हे दोषी आढळतात, असे नमूद असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महापालिका प्रशासन बोरोलेविरोधात कारवाईसाठी दिरंगाई करत आहे.
या भ्रष्ट अधिकाऱ्यावर महापालिकेने तातडीने कारवाई करावी अशी मागणी करतानाच कारवाईत टाळाटाळ  केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.