अंबरनाथ पूर्व विभागातील शिवाजी चौक ते वेल्फेअर सेंटरदरम्यान रखडलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम येत्या महिन्याभरात पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली. मात्र त्याचबरोबर शिवाजी चौकातील य. मा. चव्हाण खुले नाटय़गृह तोडून त्या ठिकाणी सुरू असलेल्या वाहनतळाचे कामही ठप्प असून या प्रकल्पासाठी लोकप्रतिनिधींनी रेल्वे स्थानकालगतच्या मैदानाचा बळी दिल्याबद्दल अंबरनाथकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
गेल्या चार महिन्यांपासून हा मुख्य रस्ता काँक्रिटीकरणासाठी अर्धाअधिक खोदून ठेवण्यात आला असून नागरिकांचे त्यामुळे प्रचंड हाल होत आहेत.
यासंदर्भात गेल्या आठवडय़ात वृत्तान्तमध्ये (१७ मे) बातमी प्रसिद्ध झाली होती. आधीच अरुंद असणाऱ्या या रस्त्यातून वाट काढणे पादचारी तसेच रिक्षा व इतर वाहनांना जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ येथे अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते. नगराध्यक्षांनी बुधवारी शहर अभियंता सुहास सावंत, विद्युत अभियंता किशोर देशपांडे तसेच जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत रखडलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.
शिवाजी चौकातील य. मा. चव्हाण खुले नाटय़गृह पाडून त्यासाठी बहुमजली वाहनतळ तसेच खुले सभागृह बांधण्याचे काम सुरू आहे.
या प्रकल्पासाठी मैदानाचा बळी देण्यास शहरातील समस्त नागरिकांचा विरोध होता. मात्र लोकप्रतिनिधींनी नागरिकांना विश्वासात न घेता हे काम रेटून नेले. आता या ठिकाणी मैदानात खोदलेल्या खड्डय़ात पाणी लागले आहे. पावसाळ्यात तर येथे तळे साचून अपघात होण्याचीही शक्यता आहे.
ठेकेदारासही काळ्या यादीत टाकण्याचा इशारा नगराध्यक्षांनी या पाहणीदरम्यान दिला.