धोकादायक परीख पुलाला पर्यायी पुल बांधण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवारी भारतीय जनतापक्षाच्या वतीने रेल्वे स्थानकासमोर निदर्शने करण्यात आली. मागणीचे निवेदन स्टेशन प्रबंधक विजयकुमार यांना देण्यात आले.    बाबुराव परीख पुल हा शहराच्या दोन भागांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. उड्डानपुलाचे(रेल्वे फाटकाचे) काम चालू असताना याच पुलाचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे.
या पुलाखालून वाहनांची प्रचंड वर्दळ असते. तसेच रेल्वे स्टेशन व एस.टी.स्टँड जवळच असल्यामुळे या या पुलाखालून वाहनांची मोठय़ा प्रमाणात वाहतूक सुरू असते. या पुलाचे बांधकाम १९६७ च्या दरम्यान झाले आहे. पुलावरून सातत्याने पाणी गळत असते. अलीकडेच या पुलाच्या स्लॅबचा काही भाग एका गाडीवर पडला होता. भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना अथवा जिवीतहाणी होण्यापूर्वी हा पुल नव्याने बांधला जावा किंवा हा पुल तसाच ठेवून तेथे एकेरी मार्ग सुरू करून शेजारी दुसरा पुल बांधण्यात यावा. त्याचबरोबर कोल्हापूर-सोलापूर ही रेल्वे रात्रीप्रमाणे सकाळीही सुरू करावी, या मागणीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.     
आंदोलनात शहराध्यक्ष महेश जाधव, विजय जाधव, संतोष भिवटे, तुषार देसाई, दिलीप मैत्राणी, संदीप देसाई, तेजस्विनी हराळे-भोसले, सुलभा मुजूमदार, मधुमती पावनगडकर, किशोरी स्वामी आदी सहभागी होते.