नगरच्या जिल्हा वाचनालयास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी २५ हजार रुपयांची पुस्तके देणगीदाखल दिली.
काँग्रेसचे शहराध्यक्ष ब्रीजलाल सारडा, सरचिटणीस अनंत देसाई व नगरसेवक धनंजय जाधव यांनी ही पुस्तके वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांच्याकडे सुपूर्द केली. माजी नगराध्यक्ष दीप चव्हाण, जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित लुणिया, वाचनालयाचे सचिव उदय काळे, विश्वस्त अजित रेखी, गणेश आष्टेकर, दिलीप पांढरे, ग्रंथपाल संजय लिहिणे आदी या वेळी उपस्थित होते.
  सारडा म्हणाले, विज्ञानयुगात माणसाने कितीही प्रगती केली असली तरी, वाचन व संस्काराशिवाय जीवन सुसंस्कारित होऊ शकत नाही. जिल्हा वाचनालयाला तब्बल १७५ वर्षांचा उज्ज्वल वारसा आहे. केवळ नगर शहरच नव्हेतर, जिल्ह्य़ात वाचनसंस्कृती रुजवण्यात वाचनालयाचा मोठा वाटा आहे. तो लक्षात घेऊनच थोरात यांनी ही पुस्तके भेट दिल्याचे सारडा यांनी सांगितले.
सुरुवातीला देसाई यांनी थोरात यांच्या या आश्वासक कृतीतून वाचन चळवळ अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होईल असे सांगितले. मोडक यांनी थोरात यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राजकारण, समाजकारण व संस्कार या तिन्हीचा संगम साधून त्यांनी दिलेली ग्रंथसंपदा वाचनसंस्कृती परिपक्व करण्यास प्रेरक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
किरण अग्रवाल, रेखी यांच्या हस्ते या वेळी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. काळे यांनी सूत्रसंचालन केले. लिहिणे यांनी आभार मानले.