स्टार कंपनीने आपल्या वाहिन्यांसाठी स्वतंत्र दर देण्याचा बोजा टाकून ग्राहक आणि केबल व्यावसायिकांना वेठीस धरल्याच्या निषेधार्थ बुधवारी नाशिक जिल्हा केबल ऑपरेटर असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. स्टार कंपनी आणि केबल व्यावसायिकांमधील वादामुळे गेल्या काही दिवसांपासून स्टारच्या वाहिन्यांचे प्रक्षेपण शहरात बंद आहे. ग्राहकांना कमीतकमी दरात केबल सेवा पुरविता यावी यासाठी अल्प दरात एकत्रित सर्व वाहिन्या उपलब्ध कराव्यात, अशी मागणी केबल चालकांनी केली आहे.
स्टार कंपनीच्या धोरणाच्या निषेधार्थ केबल व्यावसायिकानी कंपनीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. शहरातील केबल व्यावसायिक डिजिटल अॅड्रेसेबल सिस्टीमच्या कायद्यानुसार केवळ सेटटॉप बॉक्सद्वारे ग्राहकांना प्रक्षेपण दाखवितात. १ एप्रिल २०१३ पासून नवीन कायद्यानुसार एसटीबीद्वारे प्रक्षेपण केले जाते. डॅश कायदा ग्राहकांना स्वतंत्र मनोरंजन देण्यासाठी बनविण्यात आला होता. त्यानुसार वाहिन्यांच्या पॅकेजची विक्री घाऊक दरात एमएसओने एलसीओ द्यावे आणि एलसीओने ग्राहकांना किरकोळ दरात द्यावे, असे अभिप्रेत आहे. या कायद्यानुसार आजपर्यंत ग्राहकांना मनोरंजन कर आणि सेवाकरासह दरमहा २०० ते २३० रुपये दरात वाहिन्या उपलब्ध करून दिल्या. पण, गेल्या काही दिवसांपासून स्टार स्पोर्ट्स आणि स्टार इंडियाच्या वाहिन्या अ ला कार्ट व रियोमध्ये गेले. त्या कारणास्तव आम्ही ग्राहकांना कमी किंमतीत आणि आजच्या दरात काही देऊ शकत नाही. अला कार्टप्रमाणे वाहिन्या ग्राहकांना दिल्यास साधारणत: ४०० ते ४५० रुपये महिना दर पडेल. एमएसओ या दरात केबल व्यावसायिकांना कुठलीही सवलत देत नाही. यामुळे आम्हाला कमी दरात अथवा होलसेल दरात सर्व वाहिन्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे संघटनेचे नुरभाई शेख, अर्जुन धोत्रे, विजय टाकसाळे, अनिल कातकाडे आदींनी केली आहे.
या पध्दतीने कमी दरात वाहिन्या उपलब्ध झाल्यास ग्राहकांना कमीत कमी दरात केबल सेवा पुरविणे शक्य होईल. तसे न झाल्यास ग्राहकांकडून मासिक रक्कम गोळा करण्यासही अडचणी उद्भवणार असल्याची भीती केबल व्यावसायिकांनी व्यक्त केली. नाशिकमध्ये दीड लाखापर्यंत सेटटॉप बॉक्स लागलेले आहेत. तसेच याआधी ६० ते ७० लाख रुपये स्टार चॅनलला पुरविले जात होते. ही रक्कम आता कोटय़वधीमध्ये जाते.
ही सर्व रक्कम स्टारच्या माध्यमातून परदेशात जात असल्याचा आरोपही केबल व्यावसायिकांनी केला. दरम्यान, स्टारच्या वाहिन्या बंद असल्याने ग्राहकांमध्ये अस्वस्थता असून त्याचे पडसाद दरमहा भाडे व अतिरिक्त शुल्क देण्यास विरोध होण्यात उमटू शकतात. एमएसओ व ब्रॉडकास्टर्स आपले पैसे सोडण्यास राजी नसल्याने केबल व्यावसायिकांची कोंडी झाल्याचे सांगितले जाते.