एकीकडे भाजप-शिवसेना युतीला प्रमुख इच्छुकांचीच बंडखोरी टाळण्यात अपयश आले, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप हे स्वत: पत्नीची जागा बिनविरोध होऊ नये यासाठी देव पाण्यात घालून बसले होते. त्यात ते यशस्वी झाले, दोघेही आता निवडणुकीला सामोरे जातील.
महानगरपालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी संपली. उमेदवारीसाठी सर्वच पक्षांमध्ये गेले महिनाभर सुरू असलेल्या हालचाली आज खऱ्या अर्थाने थंडावल्या. या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, उद्यापासूनच प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल.
भाजपचे माजी शहराध्यक्ष मिलिंद गंधे व स्थायी समितीचे माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी, शिवसेनेचे सचिन जाधव यांची बंडखोरी टाळण्यात अपयश आले. प्रभाग ११ अ मधून गंधे, २१ ब मधून कुलकर्णी यांच्या भावजयी व १८ ब मधून जाधव अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. गंधे व कुलकर्णी यांना भाजपने या प्रभागातून उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे, तर जाधव यांचा प्रभाग जागावाटपात भाजपच्या वाटय़ाला गेला असून, तेथे भाजपने शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक जसपाल पंजाबी यांना उमेदवारी दिली आहे.
शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीची उमेदवारी करून ही जागाही बिनविरोध पदरात पाडून घेतली. शहरातील या एकमेव जागेवर बिनविरोध निवड झाली. त्याचा शिवसेनेला मोठाच धक्का बसला आहे. राष्ट्रवादी व बोराटे ही खेळी करीत असताना शिवसेनेला त्याचा थांगपत्ताही लागला नाही. पक्षातच त्याचे पडसाद उमटले आहे. मात्र हा कटू अनुभव लक्षात घेऊन शिवसेना शुक्रवारी कमालीची सतर्क झाली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी कुठे असा प्रकार होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात आली.
मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जगताप पितापुत्र संग्राम जगताप यांची तसेच त्यांच्या पत्नीची प्रभाग २९ अ आणि ब मधील निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी विशेष प्रयत्नशील होते. स्वत:वरील बिनविरोध निवडीचा शिक्का जाणीवपूर्वक पुसण्याच्या प्रयत्नात ते होते. या दोन्ही जागांवरील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे काढून घेऊ नये यासाठी त्यांचे समर्थक लक्ष ठेवून होते. त्याकडे शहराचेही लक्ष होते. या जागांवर शिवसेनेचे सुनील त्रिपाठी (अ) व त्यांच्या पत्नी (ब) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निर्धारित मुदतीत त्यांनी माघार न घेतल्याने जगताप दाम्पत्याचा निवडणुकीचा मनसुबा तडीला गेला आहे.
कर्डिले समर्थकांचेही बंड
भाजपच्या स्थानिक संसदीय समितीचे एक सदस्य आमदार शिवाजी कर्डिले यांनी काहींच्या उमेदवारीसाठी जोरदार आग्रह धरला होता. त्यातील बऱ्याच जणांना भाजपची उमेदवारी मिळाली, मात्र न मिळालेल्यांपैकी स्वप्नील शिंदे व शरद ठाणगे यांनीही मात्र अपक्ष उमेदवारीची वाट धरली आहे.