मागास विकास निधी वितरणास पालकमंत्री वर्षां गायकवाड यांनी स्थगिती दिल्याने जि. प. अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या बाबत तक्रार केली आहे. निधी वितरणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलाच वाद पेटल्याचे चित्र जिल्ह्य़ात निर्माण झाले आहे.
निधीवाटपाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी लक्ष न घातल्यास पालकमंत्री गायकवाड यांना घेराव घालण्याचा इशारा जि. प.चे विरोधी पक्ष नेते मुनीर पटेल, विनायक देशमुख यांनी दिला.
पालकमंत्री बैठका घेऊन विकासकामांना खिळ बसेल अशा प्रकारे हस्तक्षेप करीत आहेत. त्यांच्या हस्तक्षेपामुळे ३१ मार्चपूर्वी विकासकामांचा निधी खर्च होणे शक्य होणार नाही. जि. प.च्या कामात त्या अकारण हस्तक्षेप करतात. त्यांना असे करण्यास परावृत्त करावे, अशी विनंतीही बोंढारे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.