अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जामनेर पालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने भाजपचे आमदार व प्रदेश सरचिटणीस गिरीश महाजन यांच्या गटाचा पुरता धुव्वा उडविला. काँग्रेस आघाडीने २० पैकी १४ जागा जिंकून नगरपालिकेवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले. भाजपला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. जामनेरच्या मतदारांचा हा कौल म्हणजे खा. ईश्वर जैन यांचा विजय तर भाजप आमदारांसाठी धोक्याची घंटा ठरली आहे.
जामनेर नगरपालिकेसाठी रविवारी मतदान झाले. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत ७५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या दोन तासातच कौल स्पष्ट झाला. २० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने १४ जागांवर विजय संपादन करत बहुमत प्राप्त केले. त्यात राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष राजु बोहरा यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला. भाजपच्या पदरी सहा जागा पडल्या. विद्यमान नगराध्यक्षा साधना महाजन विजयी झाल्या. जामनेर विधानसभेतून विजयाची हॅटट्रीक करणाऱ्या भाजपच्या गिरीश महाजन यांनी २००८ च्या निवडणुकीत पालिका राष्ट्रवादीकडून खेचून घेतली आणि जामनेर हा भाजपचा गढ असल्याचे दाखविले. यावेळी मात्र ते आपला हा गढ राखू शकले नाहीत. राष्ट्रवादीचे खा. ईश्वरलाल जैन यांनी स्वत: कंबर कसून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सर्व गटातटांना एकत्रित आणून भाजप समोर मोठे आव्हान निर्माण केले. विकासाच्या प्रमुख मुद्यावर आघाडीने ही निवडणूक लढली. तरिही भाजप आघाडीतील नेत्यांचे मनोमिलन होईल काय, या साशंकतेत राहिला. सोमवारी जाहीर झालेल्या निकालाने या शंका फोल ठरविल्या असून आघाडीने लक्षणिय यश मिळविले.
विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेस आघाडीचे पारस ललवाणी, उत्तम पवार, मथुराबाई बेनाडे, शोभा धुमाळ, जावेद इस्माईल, मणियार शेख हसीना, अख्तरबी जफार, सुमिता नेरकर, सुनिता भोईटे, मुकुंद सुरवाडे, अनील बोहरा, सविता पाटील, नंदा चव्हाण, रुपेश जैन तर भाजपच्या ईस्माईल खान यासीम खान, साधना महाजन, छगन झाल्टे, कल्पना पाटील, महेंद्र बावीस्कर, शेख शहनाज मोहमद यांचा समावेश आहे.