भाग्योदय क्रांती कामगार संघटना या नावाने केडगाव येथे राहणाऱ्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा प्रत्येकी ५० रूपयांची कपात केली जात आहे. हे कर्मचारी केडगाव ग्रामपंचायतीमधून नगरपालिकेत व नंतर मनपात वर्ग झाल्यापासून हा प्रकार सुरू आहे.
सुमारे २५० कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी ५० रूपये कपात केले जातात. मनपाकडून नंतर ही रक्कम भाग्योदय क्रांती कामगार संघटनेकडे वर्ग केली जाते. काँग्रेसचा पदच्यूत शहरजिल्हाध्यक्ष व सध्या एका खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या भानुदास कोतकरच्या अखत्यारीत हा संघटना आहे. कोतकरच अध्यक्ष व सर्वेसर्वा असे या संघटनेचे स्वरूप आहे. अन्य पदाधिकारी कोण, ते काय करतात, मनपातील कर्मचाऱ्यांना काही अडचण आली तर त्याची सोडवणूक करण्यासाठी हे पदाधिकारी येतात की नाही याची संघटनेचे वर्गणीदार सदस्य असलेल्या कामगारांनाही माहिती नाही.
केडगाव ग्रामपंचायतीत कामाला असलेल्या (व नसलेल्याही अशी चर्चा आहे) कर्मचाऱ्यांना कोतकर यांच्या प्रयत्नांमुळे थेट तत्कालीन नगरपालिकेत वर्ग होता आले. नगरपालिकेची मनपा झाली व पुन्हा त्यांचे नशीब ऊजळले. एका ग्रामपंचायतीत इतके कर्मचारी कसे, त्याचे दप्तर आहे का, त्यांची वर्गवारी काय असे अनेक प्रश्न उपस्थित करून तत्कालीन नगरपालिकेने या कर्मचाऱ्यांना सामावून घ्यायला नकार दिला होता. मात्र दप्तर जळाले, सगळे नव्यानेच लागलेले, कायम झालेले कर्मचारी आहेत, ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे अशी मखलाशी करत व सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून अखेर कोतकरने या सर्व कर्मचाऱ्यांना ते मनपाच्या सेवेत कायम असल्याचा निर्णय करूनच आणला. त्यावर न्यायालयाचेही शिक्कामोर्तब झाले.
नोकरीत घेऊन पोटाला लावल्यामुळेच हे सर्व कर्मचारी त्यावेळच्या नगरपालिका कर्मचारी युनियनचे सदस्य होण्याऐवजी कोतकरच्या भाग्योदय क्रांती कामगार संघटनेते सदस्य झाले. तेव्हापासून त्यांच्या मागे हे दरमहा ५० रूपये वर्गणीचे शुक्लकाष्ट लागले आहे. २५० कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी ५० रूपये प्रमाणे महिन्याला १२ हजार ५०० रूपये होतात. वर्षांला ही रक्कम १ लाख ५० हजार रूपये होते. असे गेली किमान १० वर्षे सुरू आहे, म्हणजे तब्बल १५ लाख रूपये जमा झालेले आहेत. त्याचा विनियोग कसा झाला किंवा होत आहे हे विचारायची एकाही कर्मचाऱ्याची ताकद नाही. १२ ते १५ हजार रूपयांच्या वेतनातून दरमहा ५० रूपयेच कपात होत असल्याने त्याचे एकाही कर्मचाऱ्याला काही वाटत नाही, उलट त्यांच्यामुळेच तर नोकरी मिळाली असे त्यांचे म्हणणे आहे.
मनपातील मान्यताप्राप्त कामगार संघटना ही मनपा कामगार युनियन नावाची वेगळीच कामगार संघटना आहे. सर्वाधिक सदस्य याच संघटनेचे आहेत व दिवाळी बोनस किंवा कामगारांच्या कोणत्याही प्रश्नावर मनपा प्रशासन याच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत असते. भाग्योदयचे पदाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी कोणत्याही चर्चेला किंवा बैठकीला नसतात. तरीही प्रशासन केडगावच्या काही कर्मचाऱ्यांचे पैसे थेट वेतनातून कपात करून भाग्योदयला का देते असे विचारले असता कामगारांनीच तसे लेखी दिले असल्याची माहिती मिळाली. मान्यताप्राप्त नसलेल्या संघटनेच्या नावाने प्रशासनाने अशी कपात करणे गैर असल्याचे लक्षात आणून दिल्यावर यासंबधीच्या माहितीची कवाडेच बंद करण्यात आली. दरमहा वर्गणीशिवाय कामगारांना दिवाळी बोनस किंवा फरक वगैरे यासाठी एकरकमी मोठी रक्कम मिळाल्यास त्यातूनही संघटनेच्या नावाने १०० ते ५०० रूपयांपर्यंतची रक्कम कपात केली जाते. ही रक्कम तर दोन्ही संघटनांकडून घेतली जाते.
कोतकर कुटुंब राजकीयदृष्टय़ा कार्यरत होते त्यावेळीही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अस्तित्व दिसून येत नव्हते. मात्र काँग्रेसचे कोणी नेते नगरमध्ये आले, एखादा मेळावा असला, कोणाचे स्वागत करायचे असले, शुभेच्छा द्यायच्या असल्या तर त्याचे फ्लेक्स केडगावमध्ये भाग्योदयच्या वतीने लावले जायचे. त्यांच्या कामाचे स्वरूप इतकेच मर्यादीत त्यावेळी होते व आता तर तेही दिसत नाही. कोतकरांचा वरदहस्त असल्याने व मनपात त्यांचीच सत्ता असल्याने भाग्योदयच्या कामगारांना कामात काही अडचणीच नव्हत्या, हवी तिथे नियुक्ती, हवे तेवढा वेळ काम, चुका झाल्या तरी माफी, काम केले नाही तरी दुर्लक्ष असे केडगावमधील काही विशिष्ट कामगारांच्या संदर्भात चालत असे. आता सध्या कोतकर नाहीत तरीही सध्या तेच सुरू आहे. त्यामुळे केडगावमधील कामगारांनाही भाग्योदयचे अस्तित्व हवेच असून त्यासाठी दरमहा ५० रूपये मोजायची त्यांची तयारी आहे.