शिक्षकसेवक म्हणून केलेली सेवा व विनाअनुदान काळातील सेवा वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्राहय़ धरणे, राज्य व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढ देणे, मूल्यांकनाच्या जाचक तीन अटी शिथिल करणे, आदी शिक्षक व मुख्याध्यापकांबाबत मागण्या शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे त्वरित पूर्ण करण्याबाबतचे ठोस आश्वासन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षकसेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाला दिले.    
राज्य खासगी शिक्षक समितीने आपल्या विविध १८ मागण्यांबाबत मुंबई येथे आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन केले. दरम्यान, विधान परिषदेमध्ये २६० नियमाखाली सुरू झालेल्या चर्चेमध्ये आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी खासगी शिक्षकसेवक समितीच्या आंदोलनाचा उल्लेख करून विविध मागण्या मांडून शिक्षकांच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले. तर आमदार विक्रम काळे (लातूर), आमदार सुधीर तांबे (नाशिक), आमदार वसंत खोटरे (अमरावती), आमदार भगवान साळुंखे (पुणे), आमदार विजय देशमुख (सोलापूर) यांनी आंदोलनस्थळाला भेट देऊन शिक्षकांच्या मागण्यांबाबत विधानसभेत आवाज उठवला. शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्यासह जयंत हक्के (सोलापूर), राजेंद्र वाणी (औरंगाबाद), गुणेशचंद्र सोनवणे (धुळे) व नंदिनी पाटील (कोल्हापूर) यांचा समावेश होता.