मुंबईत उशिरापर्यंत चालणाऱ्या बार आणि अनैतिक धंद्यांवर कारवाई करून सर्वाना सळो की पळो करून सोडणारे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विलेपार्ले येथे अनधिकृत गॅस सिलिंडर बाळगणाऱ्या हॉटेल चालकांवर कारवाई केल्यानंतर त्यांनी अनधिकृत दुकानदारांवर पालिकेच्या मदतीने कारवाई सुरू केल्याने ‘ढोबळे’गिरीचा दुसरा टप्पा गाजू लागल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. हॉकी स्टिक घेऊन बार मालकांना सळो की पळो करून सोडणारे ढोबळे यांच्या नावाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. मुंबईतील बार आणि हॉटेल्समधील अनैतिक धंद्यांनाही ढोबळे यांनी आळा घातला होता. आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. सत्यपाल सिंग यांनी ढोबळे यांची बदली वाकोला येथे केली. तेथेही आपल्या हद्दीत त्यांनी कारवाई सुरूच ठेवली. अनेक हॉटेलांमध्ये मोटय़ा प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडर वापरले जातात. ढोबळे यांनी त्यावर छापे घालून हॉटेलमालकांच्या नाकीनऊ आणले. आता त्यांनी अतिक्रमणविरोधी कारवाईतही भाग घ्यायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ढोबळे यांनी या भागातील अनधिकृत दुकानदारांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. ढोबळे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडेही तक्रार नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी सांगितले की, आमच्याकडे ढोबळेंविरोधात एक तक्रार आली असून आम्ही त्याची चौकशी करीत आहोत. ढोबळे स्वत: अतिक्रमणविरोधी पथकाला बांधकाम तोडण्याच्या सूचना देत असल्याची एक चित्रफीत असल्याबद्दल सिंग यांना विचारले असता, मी अजून अशी चित्रफीत पाहिलेली नाही. परंतु त्याचीही खातरजमा केली जाईल, असे ते म्हणाले. याबाबत ढोबळे यांच्याशी संपर्क साधला असता मला याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.