शहराचा वाढता विस्तार आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन पाणी पुरवठय़ासाठी निर्माण होणारा विजेचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात काढण्यासाठी महानगरपालिका स्वत:चा वीज प्रकल्प उभारणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती दीपक खोपडे यांनी दिली.
शहराची तहान भागविण्यासाठी तापी योजनेला प्राधान्य देण्यात येत असले तरी त्यासाठी लागणारी वीज व त्यावरील बिलाचा खर्च पालिकेला आर्थिकदृष्टय़ा परवडणारा नाही. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर कायमस्वरुपी इलाज म्हणून पवन ऊर्जा वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या प्रक्रियेचा पाठपुरावा केला आहे. भविष्यात निश्चितच या प्रकल्पाचा शहराला मोठा लाभ होईल, असा विश्वासही खोपडे यांनी व्यक्त केला आहे. साक्री तालुक्यातील मौजे टिटाणे शिवारात पालिकेचा पवन ऊर्जा वीज निर्मिती प्रकल्प असणार आहे. त्यासाठी २५ कोटी रुपये प्रस्तावित आहेत. त्यापैकी ७० टक्के रक्कम राज्य व केंद्र शासन तसेच अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विकास मंडळांकडून मिळविण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महामंडळाला तज्ज्ञ सल्लागारांमार्फत प्रस्ताव सादर होणार आहे. प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करणे, सादरीकरण करणे या कामासाठी नागपूरच्या एक्सिनो कॅपिटल सव्‍‌र्हिसेस यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रकल्पात दोन मेगाव्ॉट वीज निर्मितीचे दोन संच उभारण्यात येणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत पालिकेला पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे ९० लाख रुपये वीज बील येते. प्रकल्पामुळे बील २५ लाखापर्यंत कमी होऊ शकेल. पालिकेचा शहरात जो एकूण खर्च विजेवर होतो. त्यात पवन ऊर्जा वीज प्रकल्पामुळे खर्चात बचत होईल. वीज निर्मिती प्रकल्प कोणी सूचविला, कोणाच्या कार्यकाळात त्याला चालना मिळाली, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर श्रेय कोणाचे, या भानगडीत पडण्यापेक्षा धुळेकर जनतेच्या हितासाठी हा प्रकल्प पूर्णत्वाला जावा ही आपली भावना असल्याचे खोपडे यांनी सांगितले.
दरम्यान नवीन वर्षांत पालिकेमार्फत धुळेकरांसाठी शहर बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. आठ दिवसात दहा गाडय़ा नागरिकांच्या सेवेत हजर होतील. त्यासाठी २५ थांबे निश्चित करण्यात आले आहेत. नगावबारी शिवारपासून रोकडोबा हनुमान मंदिर आणि वार शिवार पासून फागणे शिवारापर्यंत ही बस सेवा राहणार आहे. या माध्यमातून ५० लोकांना रोजगार दिला जाणार आहे. त्यात २० महिला वाहक राहणार आहेत. शहराच्या हद्दीबाहेरही बस सेवा देण्याचे नियोजन असल्याचे खोपडे यांनी नमूद केले.
पालिकेतर्फे स्नेह नगरात जलतरण तलाव तयार करण्यात येत आहे. तलाव परिसरात लहान्यांसाठी उद्यानासोबत कँटिन, युवकांसाठी पूल गेम, लॉन टेनिस कोर्ट, जॉगिंग ट्रॅक, आदी सुविधा देणात येणार असून त्यासाठी सुमारे तीन कोटी १५ लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे. सध्या पाण्याचा प्रश्न असला तरी टप्या-टप्याने जलतरण तलावाचे काम केले जात असल्याची माहिती खोपडे यांनी दिली.