महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे राबविण्यात आलेल्या फटाकेमुक्त दिवाळी अभियानांतर्गत ‘आम्ही फटाके उडवणार नाही’ अशी संकल्पपत्रे विद्यार्थ्यांनी भरून दिली आहेत. प्रदूषणामध्ये भर घालणाऱ्या फटाक्यांवर केल्या जाणाऱ्या खर्चाच्या रकमेतून मुलांनी खाऊ, खेळणी, पुस्तके घ्यावीत हा या अभियानाचा उद्देश आहे. समितीचे राज्य सचिव मिलिंद देशमुख आणि जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, समितीच्या पुणे, िपपरी-चिंचवड आणि चाकण शाखेने गेले २० दिवस हे अभियान राबविले आहे. याअंतर्गत १४० शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपर्यंत संकल्पपत्रे पोहोचविण्यात आली. फटाके उडविण्यावर आम्ही खर्च करणार नाही, असे लिहून देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दरवर्षी फटाके खरेदीवर होणारी रक्कम त्यामध्ये नमूद केली आहे. त्यानुसार यंदा अडीच कोटी रुपयांचे फटाके वाजणार नाहीत. गेल्या वर्षीपेक्षा ही रक्कम ५० लाख रुपयांनी अधिक आहे. या उपक्रमामध्ये भारतीय जैन संघटना, प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूट आणि लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल यांनी सहभाग घेतला.
सेवासदन शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने लक्ष्मी रस्त्यावरील व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणामध्ये भर घालणारे फटाके उडविण्याऐवजी शोभेची दारू उडवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.