विषारी वायुमुळे गटारीत गुदमरून मजुरांचा मृत्यू झाल्यानंतरही पालिकेची यंत्रणा जागी झाली नसून शहरातील अनेक भागातील गटारी ढापे गायब झाल्यामुळे धोकादायक बनल्याचे चित्र आहे. निवासी वसाहतीत ढापे बसविण्यास कानाडोळा करणाऱ्या पालिकेची नजर खुद्द आपल्या राजीव गांधी भवन या मुख्यालयात तसेच मुख्यालयालगत ढाप्याविना उघडय़ा पडलेल्या गटारींवरपडलेली नाही. ही बाब पालिकेची कार्यप्रवणता स्पष्ट करण्यास पुरेशी असून उघडय़ा गटारीत पडून कोणाचा मृत्यू झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सुमारे १० किलोमीटरच्या परिघात पसरलेल्या नाशिकमध्ये सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी गटारींची स्वतंत्र व्यवस्था आहे. जमिनीखालून सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारीची लांबी साधारणत: दीड हजार किलोमीटर तर पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या गटारीची लांबी ४०० ते ५०० किलोमीटरच्या घरात असल्याचा अंदाज आहे. तब्बल दोन हजार किलोमीटरच्या या गटारींवर २० ते ३० मीटरच्या अंतरावर चेंबर बसविण्यात आले आहेत. या माध्यमातून गटारींची स्वच्छता व दुरुस्तीचे काम केले जाते. शहरातील गटारींच्या चेंबरवर हजारो ढापे आहेत. पादचारी व वाहनधारकांना अडसर ठरू नये म्हणून चेंबरवर सिमेंटचे मजबूत असे ढापे टाकले जातात. शहरात भ्रमंती केल्यास अनेक ठिकाणी गटारींवरील हे ढापे गायब असल्याचे दिसून येते. मलनिस्सारण विभागामार्फत गटारींची दुरुस्ती व ढापे टाकण्याचे काम केले जाते. रस्त्यालगतच्या उघडय़ा गटारी पादचारी वा शालेय विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहेत. धोकादायक स्थितीबाबत वारंवार तक्रारी केल्या जात असल्या तरी आपणास दाद दिली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. संबंधित विभागाचे काम कोणत्या छाटणीने चालते याची काही उदाहरणे बिकट स्थिती सांगण्यास पुरेशी आहेत. राजीव गांधी भवनमधील अशीच एक गटार ढाप्याविना उघडी आहे. पालिका मुख्यालाच्या प्रवेशद्वारालगत वेगळी स्थिती नाही. पालिका आवार व सभोवताली हे चित्र असेल तर इतर भागातील स्थितीचा विचार न केलेला बरा, अशी एकंदर स्थिती आहे.
ज्या गंगापूर रस्त्यावरील गटारीत ही दुर्घटना घडली, त्या भागातही अनेक ठिकाणी गटारींवरील ढापे गायब असल्याचे दिसते. ही बाब स्थानिक नागरिकांसाठी जिवघेणी ठरू शकते. या संदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ढाप्यातील लोखंड मिळविण्यासाठी चोरटय़ांकडून त्यांची सर्रास चोरी होत असल्याचे सांगण्यात आले. ज्या भागात वर्दळ असते, तेथील गटारीवरील ढापे चोरीला जात नाहीत. पण, ज्या भागात वर्दळ नाही, तिथे सातत्याने हे प्रकार घडत असतात.
वर्षांकाठी वेगवेगळ्या भागातील गटारींवरील २०० ते २५० ढापे चोरीला जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. काही असंतुष्ट घटक ढापे काढून गटारीत मोठे दगड आणि मातीही टाकतात. विकृतीतून हे प्रकार घडत आहेत. सांडपाणी पाणी वाहून नेणाऱ्या व्यवस्थेची सुरक्षितता जपली न गेल्यास धोके अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.