येथील नगरपालिका व महसूल प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या  दुसऱ्या दिवशी बुधवारी भारतीय स्टेट बँक चौकाच्या परिसरातील अतिक्रमणे काढण्यात आली. त्यामुळे स्टेट बँक चौकानेही मोकळा श्वास घेतला.
गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेला अखेर मंगळवारी १२ मार्चला सकाळी सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. या मोहिमेची धास्ती घेऊन अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर केलेली अतिक्रमणे आपणहून काढून घेतली आहे. त्यातच या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी स्टेट बँक चौक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यामुळे स्टेट बँक चौकाकडे येणारे रस्ते आणि स्टेट बँक चौक आज मोकळा दिसत आहे. याशिवाय, येरावार मार्केट, हनुमान आखाडा चौक ते पूनम चौक या मार्गावरील अतिक्रमणेही हटविण्यात आली.
या मोहिमेविरुद्ध काही व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केली होती. या मोहिमेदरम्यान शहराच्या मध्यभागी असलेल्या अतिक्रमित अमराईपुरा परिसरातील अतिक्रमणेही काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्या ठिकाणी तार असलेल्या ४२ पक्क्या घरांपकी केवळ १६ घरांची लीज वाढवून देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, उर्वरित पक्क्या  घरांसदर्भात निर्णय झालेला नाही. या पक्क्या घरांव्यतिरिक्त अतिक्रमण करून तयार करण्यात आलेल्या कच्च्या घरांची अतिक्रमणे काढण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच शहरातील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात येतील, अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत.