नगर शहराचे लवकरच गुगल अर्थच्या धर्तीवर उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी महानगरपालिका जिऑग्राफिकल इन्फरर्मेशन सिस्टीम (जीआयएस) ही संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. दीर्घकालीन नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या या प्रणालीसाठी मनपाकडे तीन निविदा दाखल झाल्या आहेत.
गुगल अर्थच्या नकाशाच्या धर्तीवरच शहर हद्दीचे या पद्धतीने सर्वेक्षण करण्यात येणार असून, इमेजच्या स्वरूपात मिळणारी ही माहिती कायमस्वरूपी साठवण्यात येणार आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या पूर्णत्वाला दोन वर्षे लागतील. गुगल अर्थच्या नकाशावर शहराच्या सर्व इमेज पाहण्यास मिळतात, मात्र त्याचा वापर आपण करू शकत नाही. तो करायचा झाल्यास त्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागते. त्याच धर्तीवर मनपा हद्दीत ही जीआयएस ही संगणक प्रणाली कार्यान्वित करून ही माहिती साठवण्यात येईल.
या सर्वेक्षणामुळे शहरातील घर ना घर, गल्ली ना गल्ली, रस्ते, सर्व मालमत्ता याच्या इमेजेस नजरेच्या टप्प्यात येतील. नियोजनबद्ध विकासासाठी त्याचा मोठा उपयोग होणार असून, या इमेज विकसित करूनच सर्व स्वरूपाची कामे करता येतील. मनपातील आरोग्य, बांधकाम, नगररचना, पाणीपुरवठा आदी सर्वच विभागांची या स्वरूपाची माहिती मिळावी यादृष्टीने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याद्वारे बारीक गल्लीबोळातील गटारही या इमेजवर येऊन त्या ठिकाणी काम करताना या प्रणालीचा मोठा उपयोग होईल. मनपाच्या अनेक मालमत्ता आजही मनपाच्या ताब्यात नाहीत. अनेक मालमत्तांची मनपाच्या रेकॉर्डला माहितीही नाही. अशा मालमत्ताही या प्रणालीद्वारे सहजगत्या प्रकाशात येतील. ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर रस्ते किंवा तत्सम कामे, जलवाहिन्यांची कामे, भुयारी वीजवाहिन्या अशा सर्वच स्वरूपाची कामे अधिक सुकर होतील, त्याद्वारे विकासाचा दीर्घकालीन नियोजनबद्ध आराखडाही तयार करून त्याची अंमलबजावणी सहज शक्य होईल अशी माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली.
पुणे, मुंबई, नाशिकसारख्या शहरांमध्ये पूर्वीच हा प्रकल्प कार्यान्वित झाला असून, मनपाच्या दैनंदिन कामातही त्याचा मोठा वापर सुरू असल्याचे सांगण्यात येते. नगर शहरात हा प्रकल्प उभारण्यासाठी मनपाने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी तीन निविदा आल्या असून, स्थायी समितीच्या परवा (शुक्रवार) होणाऱ्या सभेसमोर याबाबतचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.