शिधापत्रिका धारकांसाठी देण्यात आलेले धान्य थेट काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याच्या संशयावरून धुळे पोलिसांनी सात वाहने ताब्यात घेत २८६ क्विंटल गहू व तांदूळ जप्त केला. वाहनांसह या सर्व मुद्देमालाची किंमत १६ लाख ५० हजार रुपये असून या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी सोमवारी पहाटे सापळा रचून मुंबई-आग्रा महामार्गावरील दहिवद शिवारात ही कारवाई केली. धान्याची वाहतूक करणारा चालक आणि सहचालकासह या प्रक्रियेत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी विश्वास महादू गवळे, सुकलाल तेरसिंग पावरा, अमृत भुक्कन पावरा, चेतन कन्हय्यालाल राजपूत, जगदीश वीरसिंग पावरा, शांतिलाल राजपूत, नाना फुलपगारे यांना अटक केली.
हे सर्व संशयित शिरपूर तालुक्यातील रहिवासी आहेत. तालुक्यातील शिंगावे येथील राजेश नथ्थू पाटील व संदीप जमादार यांनी या धान्याची जमवाजमव करून मध्य प्रदेशातील सेंधवा येथे पाठविण्याची व्यवस्था केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.