मान्सूनपूर्व पावसाने संपूर्ण सातारा जिल्ह्य़ात हजेरी लावली. हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस दुष्काळी माण,खटाव,फलटणसह इतरत्रही झाला.
रविवारी सायंकाळी जिल्ह्य़ाच्या काही भागात पाऊस झाला होता. महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा या परिसरात चांगला पाऊस झाला होता. आज सोमवारीही दुपारी पाच पासून सायंकाळी उशिरापर्यंत हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू होता. हा पाऊस शेतकऱ्यांना मशागतयोग्य नसला तरीही अनेक दिवस पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वानीच थोडा सुस्कारा सोडला.
खंडाळा, फलटण व माण, खटाव भागातही पाऊस झाला. मागील आठवडय़ात खटाव तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाल्याने तेथील ओढे नाले भरभरून वाहिले होते, तर नेर तलावातही सात टक्के पाणी साठले होते. त्यामुळे लवकरच इतरत्रही पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
या पावसाने हवेतील उष्णता घालवून गारवा निर्माण केला. त्यामुळे सर्वानाच थोडे हायसे वाटले. मात्र या पावसाने विद्युत पुरवठय़ावर परिणाम झाला. थोडय़ाशाच पावसाने मागील दोन दिवसांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या पाणीपुरवठय़ावर अनेक गावात अडचण निर्माण झाली आहे.
पाचगणी, महाबळेश्वरमध्ये आज आलेल्या पावसाने पर्यटकांनी भिजण्याचा आनंद लुटला. थंड हवेच्या या स्थळी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना संध्याकाळी छत्र्या घेऊनच सर्वत्र फिरावे लागले.