शहराप्रमाणेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला असून शहरात किमान काही प्रमाणात अशा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत असले तरी ग्रामीण भागात वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच कुठे दिसत नाही. काही ठिकाणी तर वाहतूक पोलीस आणि नियमबाह्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे संबंध इतके मधूर आहेत की, जणूकाही वाहतूक पोलिसांकडून खासगी वाहतूकदारांना कोणताही धोका कधीच होऊ शकणार नाही. त्यामुळे एकेका रिक्षा किंवा टॅक्सीत प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक, काहीवेळा तर थेट टॅक्सीला मागे लटकून किंवा वर टपावर बसवून प्रवाशांची वाहतूक होताना दिसते. अशा प्रकारच्या वाहनांना कधी एखादा अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे नाटक केले जाते. नंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राज्य परिवहन मंडळाकडून होत असलेल्या वाहतूक सेवेत योग्य नियोजन नसल्याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांना होत आहे. प्रवाशांच्या सोईनुसार बसची सेवा नसणे, कधी तीन ते चार तास एकही बस नसणे आणि कधी एकाच तासात तीन-चार बस असणे, असे प्रकार ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात. या गैरसोयींना वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. ग्रामीण भागातील जवळपास बहुतेक बस स्थानकांना खासगी प्रवासी वाहतुकदारांचा गराडा पडलेला राहात असल्याने या वाहतुकदारांचे दलाल बस स्थानकातून प्रवासी पळविण्याचेही काम करतात. हे वाहतूकदार लहान मुलांचे कोणतेही भाडे घेत नाहीत, शिवाय प्रवासी सांगतील त्या ठिकाणी वाहन उभे करण्यात येते. या फायद्याच्या गोष्टींमुळेही बसऐवजी प्रवाशांकडून रिक्षा, टॅक्सी सेवेला प्राधान्य दिले जाते. अर्थात प्रवाशांच्या दृष्टीने या जमेच्या बाजू असल्या तरी खासगी प्रवासी वाहतूक ही तितकीच धोकादायकही आहे. बस चालकावर जबाबदारीचे ओझे असल्याने सुरक्षितपणे बस चालविण्यास त्यांच्याकडून प्राधान्य दिले जाते. याउलट खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिवसातून अधिकाधिक फेऱ्या करून कमाई करावयाची असल्याने त्यांच्याकडून वाहन चालविताना सुरक्षिततेऐवजी  वेगाला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते.
ओझर, दिंडोरी, निफाड, नामपूर, देवळा, दाभाडी, ताहाराबाद, घोटी, पेठ, हरसूल, ग्रामीण भागातील अशा कोणत्याही गावाचे नाव घ्या, अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठलेला दिसून येईल. वाहनांमध्ये प्रवासी अक्षरश: कोबून भरलेले असतात. एकेका रिक्षात दहापेक्षा अधिक तर, टॅक्सी किंवा अ‍ॅपेरिक्षात हीच संख्या १५ ते २० दरम्यान गेलेली दिसून येईल. परिसरातील आठवडे बाजार किंवा लग्नसराईत तर खासगी प्रवासी वाहतूकदारांची चांदीच चांदी असते. वाहनाच्या मागे, टपावर तसेच पुढील भागावरही प्रवासी बसविलेले असतात. ही धोकादायक वाहतूक पोलिसांच्या देखत होत असतानाही त्यांच्याविरूध्द कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. वाहतूक पोलिसांना ठराविक ‘हप्ता’ दिल्यावर कारवाईपासून मुक्तता होत असल्याची चर्चा आहे. हप्ता थकल्यावर मात्र पोलिसांकडून कारवाई होते. बऱ्याच वेळा रिक्षांची तपासणी होणार असल्याचे चालकांना आधीच कळलेले असते. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एखाद्या वाहनास अपघात झाल्यावर या विषयाचा गवगवा होत असल्याने वाहतूक पोलिसांना काही दिवस कारवाईचा ‘फार्स’ करणे भाग पडते. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी नियमितपणे ग्रामीण भागात तपासणी मोहीम सुरू केल्यास अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीस आळा बसू शकेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Additional fare EFT is being allowed for passengers traveling in reserved coaches on ordinary tickets
आरक्षित डब्यांत रेल्वेच्या कृपेने ‘साधारण’ प्रवाशांचा सुळसुळाट
dombivli traffic jam marathi news
माणकोली उड्डाण पुलांवरील वाहनांमुळे रेतीबंदर फाटकात दररोज वाहन कोंडी, वाहतूक पोलीस नसल्याने स्थानिकांकडून नियोजन
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी
four dumpers of road waste are seized in panvel Action by CIDCO
पनवेल : राडारोडा टाकणारे चार डंपर जप्त, सिडकोची कारवाई