कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी विजापूर जिल्हय़ात सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांची पक्षाच्या निरीक्षक म्हणून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नेमणूक केली आहे. याशिवाय माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनाही निरीक्षक म्हणून कर्नाटकात पाठविण्यात आले आहे.
सोलापूरला खेटून असलेल्या विजापूर जिल्हय़ातील इंडी मतदारसंघात सोलापूरचे रवि पाटील हे कर्नाटक जनता पक्षातर्फे उभे आहेत. रवि पाटील हे यापूर्वी इंडीतून सलग तीन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. मागील निवडणुकीत ते पराभूत झाले. यंदा ते पुन्हा विधानसभेवर निवडून येण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी उतरले आहेत. पाटील हे सोलापूरचे खासदार तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे शत्रू समजले जातात. रवि पाटील हे कसल्याही परिस्थितीत निवडून येता कामा नये म्हणून शिंदे यांनी सूचना दिल्याचे समजते. या पाश्र्वभूमीवर शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी विजापूर जिल्हय़ातील इंडीसह सर्व आठ मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.