जवळपास अकरा रस्ते प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे येऊन मिळणाऱ्या मुंबई नाका या विस्तीर्ण चौकातील वाहतूक कोंडी उड्डाण पूल प्रत्यक्षात आल्यानंतरही सुटलेली नाही. उलट विविध रस्त्यांवरून चढाओढीने पुढे जाणाऱ्या वाहनधारकांमुळे नियमन करताना पोलिसांची अक्षरश: दमछाक होते. वेगवेगळ्या बाजुने घुसखोरी करणाऱ्या वाहनांमुळे दुचाकी वाहनधारक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. ‘गोंधळात गोंधळ’चा अंक या चौकात दिवसभर सुरू असतो.
मुंबईकडून येणाऱ्या तसेच उड्डाण पुलामुळे विभागल्या गेलेल्या शहराच्या दोन्ही बाजुकडील भागांना जोडणारा प्रमुख चौक म्हणून मुंबई नाक्याकडे पहावे लागेल. उड्डाण पुलाखालील दोन्ही सव्‍‌र्हिस रस्त्यांसह या चौकात भाभानगर, दादासाहेब गायकवाड सभागृहाकडून येणारा रस्ता, शहरातून मुंबई नाक्याकडे जाणारा जुना महामार्ग, जुन्या वाहतूक नियंत्रण कार्यालयाच्या बाजुचा रस्ता तसेच त्या समोरील बाजुस नासर्डी नदीकडे जाणारा रस्ता अशा वेगवेगळ्या मार्गाचे जंजाळ आहे. प्रत्यक्ष मुंबई नाका आणि त्या सभोवताली सव्‍‌र्हिस रस्त्याव्यतिरिक्त येऊन मिळणारे अन्य मार्ग यात कमी-अधिक अंतर आहे. उपरोक्त रस्त्यांवरून दोन्ही बाजुने वाहने येत असल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन चौकालगत विस्तीर्ण स्वरुपाचे वाहतूक बेट तयार करण्यात आले. सव्‍‌र्हिस रस्त्यावरून थेट द्वारकाकडे न जाणाऱ्या वाहनधारकांची कोंडी होऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली. सर्व मार्गावरून येणारे वाहनधारक समोरासमोर येऊ नये हा त्यामागे उद्देश होता. तथापि, या चौकाचे अवलोकन केल्यास दिवसातील कोणत्याही वेळी कोण नेमके कुठून कुठे चालले ते लक्षात येत नाही. दोन ते तीन वाहतूक पोलीस खास चौकासाठी तैनात असले तरी वाहतूक सुरळीत करताना त्यांची दमछाक होते. विचित्र कोंडीत सापडलेल्या चौकात सव्‍‌र्हिस रस्ते तुलनेत आकाराने मोठे आहेत. यामुळे बाहेरगावच्या मालमोटारी, चारचाकी वेगात असतात. भाभानगर, त्या लगतच्या हॉटेलजवळून जाणारा रस्ता व अन्य रस्त्यांवरून बहुतांश शहरवासीयांची वाहने मार्गक्रमण करतात. चौकात या सर्व वाहनांचा परस्परांसमोर सामना होतो. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असली तरी वाहनधारकांचे व्यवस्थापन जटील समस्या झाल्याचे दिसते. एका बाजुचा सिग्नल सुटला तरी समोरील बाजुने वाहने जात असतात. यामुळे गोंधळ उडालेला असतो. त्यात चौकालगतच्या रस्त्यांवरून येणारी आणि त्या रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांमुळे गोंधळात अधिक भर पडते.
सायंकाळी चार ते रात्री नऊ या कालावधीत हा चौक पार करणे एक आव्हान ठरते. द्वारका चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नाशिकरोडकडे जाणारे व तिथून येणारे वाहनधारक भाभानगरमधून शहरात प्रवेश करण्यास प्राधान्य देतात. यामुळे चौकातून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असली तरी नियोजनाअभावी गोंधळाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. ही बाब अपघातांना कारक ठरली आहे. ज्या दिवशी उड्डाण पुलाचे उद्घाटन झाले, त्याच दिवशी पुलावर याच ठिकाणी दोघांचा मृत्यू झाला होता. काही वर्षांपूर्वी वाहतूक पोलीस कार्यालयासमोर मालमोटारीच्या धडकेत काही युवकांना प्राण गमवावे लागले होते. चढाओढीत वाहनांचा धक्का लागणे वा तत्सम छोटे अपघात हा नित्याचा प्रश्न बनला आहे. वाहतूक पोलीस वाहनधारकांना शिस्त लावताना हतबल झाल्याचे पहावयास मिळते.
अवजड वाहनांना प्रवेश बंदी, एकेरी वाहतूक करावी
सुमारे ११ रस्ते या चौकात एकत्र येतात. नाशिकरोडकडे जाणारे व इतर भागातून ये-जा करणाऱ्यांना मुंबई नाका हा चांगला पर्यायी मार्ग वाटतो. परिणामी, वाहनांची प्रचंड गर्दी या चौकात असते. चौकात येवून मिळणाऱ्या रस्त्यांची संख्या मोठी असल्याने सिग्नल यंत्रणाही अपुरी पडते. वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. मुंबई नाका चौकालगतच्या महामार्ग बस स्थानकाबाहेरील रस्त्यांवर खासगी बसेस उभ्या राहतात. यामुळे चौकाकडे येणाऱ्या रस्त्यांवर कोंडी होते. महामार्गावरून धुळे वा मुंबईकडे जाणारे वाहनधारक उड्डाण पुलावरून न जाता सव्‍‌र्हिस रस्त्यांचा वापर करतात. या चौकात अवजड वाहनांना प्रवेश बंद करणे हा एक उपाय आहे. तसेच आसपासच्या रस्त्यांवर एकेरी वाहतूक केल्यास व्यवस्थापन करता येईल. पिंप्री चिंचवडप्रमाणे भुयारी मार्ग करण्याची गरज आहे. गोविंदनगर येथे उड्डाण पुलाखालील व्यवस्था विस्तारल्यास मुंबई नाका चौकातील वाहतुकीचा ताण कमी होऊ शकतो. वाहतुकीला अडथळे ठरणाऱ्या खासगी बस वाहतुकीसाठी महापालिकेने स्थानकाची व्यवस्था करावी. जेणेकरून वाहतूक कोंडीत भर घालणाऱ्या बसेसचा विषय मार्गी लागेल.
वसंत गिते (माजी आमदार)