ऑक्टोबर महिना सरायला लागला आणि दिवाळीचे वेध लागले की, सर्वप्रथम थंडीची चाहूल लागते. ही थंडी मुंबईकरांना घराबाहेर पडण्यास प्रवृत्त करते. त्यामुळेच या मस्त थंडीच्या दिवसांत मैफिलींचे  आयोजन सर्वात जास्त होते. उत्तम वातावरणाबरोबरच शास्त्रीय संगीतातील दिग्गजांची भारतातील उपस्थिती हादेखील एक महत्त्वाचा भाग यामागे आहे, असे गेली १२ वर्षे शास्त्रीय संगीताच्या मैफिली आयोजित करणाऱ्या वैभव पाटील यांनी सांगितले.
नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांत जास्तीत जास्त मैफिली होण्यासाठी तीन गोष्टी कारणीभूत आहेत. सर्वात पहिले कारण म्हणजे वातावरण! मुंबईतील पावसाळा हा अशा प्रकारच्या मैफिलींसाठी अजिबात उत्साहवर्धक नसतो. त्याचप्रमाणे मुंबईत पाऊस असतो, त्या वेळी उत्तरेत बऱ्यापैकी कडकडीत उन्हाळा सुरू असतो. त्यामुळे तेथेही फारश्या मैफिली होत नाहीत. पण तेच अमेरिका, युरोप या देशांमध्ये या काळात ‘समर’ सुरू असतो. तेथील भारतीय आयोजक अनेक कलाकारांच्या मैफिली तेथे आयोजित करतात.
दुसरा मुद्दा म्हणजे गेल्या काही वर्षांपासून डिसेंबर-जानेवारी या काळात अनिवासी भारतीय दरवर्षीच भारतात येत असतात. गेल्या काही वर्षांत विमानाच्या तिकिटाचे दर कमी झाल्याने याआधी तीन-चार वर्षांनी येणारे हे अनिवासी भारतीय आता दरवर्षीच येतात. त्यामुळेही मुंबईत मैफिलींचे प्रमाण जास्त असते, असे ज्येष्ठ कलाकार आणि गुणीदास संगीत संमेलनाचे आयोजक पं. सतीश व्यास यांनी स्पष्ट केले. सत्तरीच्या दशकापासून भारतातील कलाकार प्रामुख्याने युरोप व अमेरिकेत नेमाने जायला लागले. या कालावधीतच तेथील लोकांची भारतीय शास्त्रीय संगीताबद्दलची रूची वाढली.
पं. रविशंकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार जगभर केल्यानंतर शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गजांनी युरोप-अमेरिकेत आपापली संगीत विद्यालये सुरू केली. वर्षांतील एप्रिल ते जून व सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत आपले दिग्गज कलाकार परदेशात असतात. मात्र नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत हे कलाकार भारतातच वास्तव्याला येतात. त्यामुळे त्यांच्या जास्तीत जास्त मैफिली याच कालावधीत होतात, असे सांगितले जाते.
गेल्या काही वर्षांपासून मुंबईत शास्त्रीय संगीताच्या मैफिलींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या मैफिली वर्षभर होत असल्या, तरीही नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांत त्यांची संख्या सर्वात जास्त असते. यंदा डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांतच मुंबईत अनेक दिग्गज कलाकार तब्बल ४० हून अधिक कार्यक्रमांमध्ये आपली कला सादर करत आहेत. यात उस्ताद झाकीर हुसेन, पं. शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरसिया अशा अनेक बुजुर्गाचा समावेश आहे. त्यांच्यासह अनेक नवोदित पण तयारीचे कलाकारही या मैफिलीतून लोकांसमोर येत आहेत. नेहरू सेंटर, षण्मुखानंद सभागृह, रवींद्र नाटय़मंदिर अशा वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या या मैफिलींना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसादही लक्षणीय आहे. या काळातच मैफिलींची संख्या का जास्त असते, या मैफिलींचे अर्थकारण कशावर अवलंबून असते अशा अनेक गोष्टींचा हा उहापोह..
बदलती आर्थिक गणिते
शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचे किंवा महोत्सवाचे आयोजन करण्याची सगळीच गणिते आता बदलली आहेत. आता एखादा महोत्सव आयोजित करताना अनेक गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. त्यापैकी प्रमुख मुद्दा असतो तो महोत्सवाच्या प्रसिद्धीचा! काही वर्षांपूर्वी खूप कमी महोत्सव होत होते आणि त्यांच्या तारखा ठरलेल्या होत्या. मात्र आता तो काळ जूना झाला असून नव्या तंत्रात प्रसिद्धीला खूप महत्त्व आले आहे.      – पं. सतीश व्यास.