*       सिडकोमधील घटना
*       संतप्त नागरिकांचा रास्ता रोको
अतिशय दाटीवाटीच्या सिडको परिसरात घराजवळून गेलेल्या धोकादायक वीज वाहिन्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या परिसरात ११ ‘केव्हीए’च्या वाहिनीचा झटका बसल्याने बुधवारी एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. पवननगर भागात झालेल्या या दुर्घटनेस महापालिका व वीज कंपनी जबाबदार असल्याचा ठपका ठेवत स्थानिकांनी रास्तारोकोद्वारे आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. नगरसेवक आ. अपूर्व हिरे यांचे प्रभागातील समस्यांकडे दुर्लक्ष असल्यानेच हा प्रकार घडला असून त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा अथवा त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. काही दिवसांपूर्वी याच परिसरात एका महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता.
सिडकोतील प्रभाग क्रमांक ४६ मधील पवननगर चौकात सकाळी आठ वाजता ही दुर्घटना घडली. त्यात संजय वसंत कोठावदे (४९) या व्यावसायिकाचा मृत्यू झाला. पवननगर रस्त्यावर त्यांचे कपडय़ाचे दुकान आहे. या रस्त्यावरून ११ केव्हीए क्षमतेची वीज वाहिनी गेली आहे. सकाळी घराबाहेर आल्यानंतर दुकानाचा लोखंडी फलक कोठावदे यांना जमिनीवर पडलेला दिसला. फलक उचलत असतानाच कोठावदे यांना विजेचा जबरदस्त धक्का बसून तो जागीच गतप्राण झाला. या घटनेची माहिती समजल्यानंतर एकच धावपळ सुरू झाली. पहाटेच्या सुमारास शहर व परिसरात पावसाचा शिडकावा झाला होता. फलकावर पडलेल्या बारीक विजेच्या तारेतील प्रवाह फलकात उतरला होता, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरातील घराजवळून जाणाऱ्या कमी व उच्च क्षमतेच्या वाहिन्या भूमिगत कराव्यात, याकरिता स्थानिकांकडून पालिका, वीज कंपनी व स्थानिक नगरसेवकांकडे वारंवार मागणी करण्यात आली. तथापि, या सर्वाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरीक व व्यावसायिकांनी केला.
मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस मुकेश सहाणे, माकपचे नगरसेवक तानाजी जायभावे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाणे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी रास्तारोको केला. वारंवार निवेदन व तक्रार अर्ज देऊनही स्थानिक नगरसेवक अपूर्व हिरे यांनी या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार व नगरसेवक असणाऱ्या हिरे यांना दोन पदे सांभाळता येत नाहीत. स्थानिकांना ते कधी भेटत नाहीत. यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सहाणे यांनी केली. हिरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा न दिल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. जायभावे यांनी या दुर्घटनेस पालिकेला जबाबदार धरले. भूमिगत वीज वाहिनीचे काम पूर्णत्वास जाऊनही वाहिन्यांवरून जाणारा वीज प्रवाह खंडित करण्याची दक्षता घेण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
सिडकोतील घरांजवळून जाणाऱ्या धोकादायक वीज वाहिन्यांमुळे आजवर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वीच पवननगरच्या मागील बाजूस असणाऱ्या श्रीरामनगरमध्ये एका महिलेस विजेच्या धक्क्याने प्राण गमवावे लागले होते. या परिसरात वीज वाहिन्या रस्त्यावरील घरांच्या इतक्या जवळून गेल्या आहेत की कोणी गॅलरीतून चुकून हात बाहेर काढला तरी त्याला विजेचा धक्का बसू शकतो.
या वीज वाहिन्या भूमिगत कराव्यात, अशी स्थानिकांची मागणी असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. काही मोजक्याच भागात अशी व्यवस्था झाली असली तरी बहुतांश परिसर आजही धोकादायक वीज वाहिन्यांच्या विळख्यात आहे. शहरातील अनेक भागात वीज वाहिन्या भूमिगत करण्यास प्राधान्य दिले जात असताना ज्या सिडकोमध्ये त्याची खरी आवश्यकता आहे, तो भाग त्यापासून वंचित राहिला आहे. त्याची परिणती वारंवार दुर्घटनांमध्ये होत असल्याची स्थानिकांची भावना आहे.