सेनापती बापट पतसंस्थेस कर्जवसुलीसाठी दिलेल्या धनादेशाचा न वटल्याने सांगवीसूर्यच्या सरपंच सीताबाई रामदास रासकर यांना पारनेर न्यायालयाने बुधवारी एक वर्षाची कैद व ६ लाख ९० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
यासंदर्भात संस्थेचे कर्मचारी मीनानाथ शिंदे यांनी पारनेर न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीची सुनावणी होऊन त्यात सरपंच रासकर दोषी आढळल्या. दि. १३ मार्च २००७ रोजी सरपंच रासकर यांचे पती रामदास रासकर यांनी सेनापती बापट पतसंस्थेच्या पारनेर शाखेतून सहा लाख रुपये कर्ज घेतले होते. ते थकल्याने संस्थेने कर्जाची मागणी केल्यानंतर रामदास रासकर यांच्या पत्नी सीताबाई यांनी जिल्हा सहकारी बँकेचा धनादेश दिला होता. संस्थेने हा धनादेश बँकेत भरला असता खात्यावर पैसे शिल्लक नसल्याने तो न वटता परत आला. या खटल्याची सुनावणी सहन्यायाधीश जयश्री जगदाळे यांच्यापुढे झाली. संस्थेच्या वतीने वकील पंडितराव कोल्हे यांनी काम पाहिले.