केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अकोल्यात दोन वर्षांपूर्वी एका सभेत अकोला जिल्हा बँकेचे विभाजन करून वाशिम जिल्हा बँकेच्या निर्मितीस तत्वत मंजुरी दिली होती. अद्याप अकोला जिल्हा बँकेचे विभाजन का झाले नाही, असा प्रश्न पत्रकारांनी राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना केला असता त्यांनी जाहीर केले म्हणजे निर्णय होत नाही, असे म्हणत केंद्रातील नाबार्डकडे चेंडू टोलावला. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या माध्यमातून केंद्र सरकारच्या निर्णय क्षमतेवर अप्रत्यक्षपणे टीका त्यांनी केल्याची चर्चा येथे होती.
अकोला जिल्हा बँकेच्या विभाजनाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांंपासून प्रलंबित आहे. असे असताना नाबार्ड गेल्या दोन वर्षांंपासून अहवाल व तपासणी करण्यात गुंग असून त्यामुळे वाशिम जिल्हा बँकेचा मुद्दा प्रलंबित आहे. वाशिम येथील राजकीय नेते या मागणीकडे लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण होत आहे. शरद पवार यांनी अकोल्यातील जाहीर सभेत दोन वर्षांपूर्वी अकोला जिल्हा बँकेच्या विभाजनास तत्वत मंजुरी दिली होती. आता नाबार्ड अहवाल आणि तपासणीच्या नावाखाली खोडा घालत आहे, असा संशय निर्माण होत आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांंपासून प्रलंबित मुद्दा कधी सुटेल, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता नाबार्डने जिल्हा बँकेच्या विभाजनाची मंजुरी दिली, तर तात्काळ अकोला जिल्हा बँकेचे विभाजन करण्यात येईल, असे मत सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या जाहीर सभेत हर्षवर्धन पाटील उपस्थित असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यात पुढील एका वर्षांच्या आत ३३५ सहकार भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्र्यांनी दिली. प्रत्येकी २५ लाख रुपयांचे हे सहकार भवन असेल, अशी माहिती त्यांनी दिली. विदर्भाकरिता वेगळे सहकार पॅकेज राज्य सरकार तयार करण्यात येत असून त्या माध्यमातून सहकार, पणन, वस्त्रोद्योग, मत्स्योद्योग, दुग्धव्यवसाय यांचा अंतर्भाव होणार आहे. पुढील दोन महिन्यात हे पॅकेज तयार करण्यात येईल. त्याबद्दल सविस्तर माहिती येत्या महिन्यात देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
गेल्या तीन वर्षांपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जात सुमारे चौपट वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी परिमल सिंह, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.संतोष कोरपे, बाबाराव विखे पाटील, डॉ.सुभाषचंद्र कोरपे, शिरिष धोत्रे, सुहास तिडके, रमेश हिंगणकर, सुनील धाबेकर, हिदायत पटेल, हेमंत देशमुख व सहकार खात्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.