आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्य़ाची छाननी करण्यात येऊन तपास संयमाने हाताळला जावा, अशी मागणी शनिवारी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्याकडे केली. डॉ.जाधव यांनी या प्रकरणाचा फेरतपास करण्यात येईल, असे आश्वासन दिले.    
गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याप्रकरणी आमदार क्षीरसागर यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई अपर पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी केली. यावरून जिल्ह्य़ातील युतीच्या आमदारांनी ज्योतीप्रिया सिंग यांना टीकेचे लक्ष्य केले होते. पाठोपाठ शनिवारी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रावते, पुण्याचे आमदार विजय शिवतारे, अरूण दुधवाडकर, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ.सुजित मिणचेकर, तसेच संजय पवार, विजय देवणे,मुरलीधर जाधव या जिल्हा प्रमुखांनी पोलीस अधीक्षक जाधव यांची भेट घेतली. या भेटीवेळी हे प्रकरण पोलिसांनी संयमाने हाताळावे अशी मागणी करण्यात आली.     
यानंतर पत्रकार परिषदेमध्ये रावते यांनी या संदर्भात युतीची भूमिका मांडली. ते म्हणाले, गणेशविसर्जन मिरवणुकीतील ‘त्या’ घटनेवरून क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तो चुकीचा असल्याने त्याची छाननी केली जावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांचे हात बांधले गेले आहेत. तरीही त्यांनी आतताईपणा न करता धरपकडीचे सत्र सुरू करू नये, अन्यथा जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊन टोलग्रस्त कोल्हापूरमध्ये आणखी एका उग्र आंदोलनाची सुरूवात होऊ नये. पोलीस कारवाईमध्ये शिवसेनेला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याच्या मुद्याचा इन्कार करून रावते म्हणाले, भाजपा-शिवसेना युती जनतेसाठी सातत्याने लढत आहे. अशावेळी पोलिसी कारवाईला सामोरे जाण्यामध्ये आम्हाला नवे काही वाटत नाही. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करतांना वास्तवाकडे दुर्लक्ष करता कामा नये. गणेशोत्सवासारखा सण जल्लोषात साजरा करावा, अशी जनभावना असते. त्याला गालबोट लागणे अयोग्य आहे. शिवसेनेच्या मंचाजवळ मिरवणुका रेंगाळत ठेवल्या जात नव्हत्या, तर त्या राजेश क्षीरसागर यांच्या प्रेमापोटी थांबत होत्या.
दरम्यान, युतीच्या शिष्टमंडळाशी झालेला चर्चेचा तपशील देतांना पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव म्हणाले, की राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आमदार क्षीरसागर यांच्यासह अन्य लोकांवर दाखल झालेल्या गुन्ह्य़ाची माहिती शिष्टमंडळाने घेतली. त्यांनी कोणावरही नाहक अन्याय होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या गुन्ह्य़ाचा पोलिसांकडून पारदर्शकपणे तपास सुरू आहे. गुन्ह्य़ात ज्यांचा सहभाग होता त्यांच्यावरील अटकेची कारवाई योग्य वेळी होणार आहे. कायदा आपले काम निश्चित दिशेने करीत राहिल. विनयभंगाच्या गुन्ह्य़ाचा फेरतपास करण्यात येणार आहे. या गुन्ह्य़ाचा तपास करतांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांत मतभेद असल्याचा त्यांनी इन्कार केला. योग्य वेळी योग्य तो हस्तक्षेप आपण केला असल्याने त्यातून चांगलेच निष्पन्न झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.