पंचवीस तोळे सोन्याच्या खंडणीसाठी खून करण्यात आलेल्या दर्शन रोहित शहा या शालेय विद्यार्थ्यांच्या खुनातील आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र या संदर्भातील तपशील अधिकृतरीत्या उद्या सोमवारी उघड केला जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.    
देवकर पाणंद या परिसरामध्ये राहणाऱ्या दर्शन रोहित शहा या १० वर्षांच्या शालेय विद्यार्थ्यांचा २६ डिसेंबर रोजी खून झाल्याचे उघडकीस आले होते. आदल्या दिवशी सायंकाळी तो बेपत्ता झाला होता. त्यावर त्याच्या आईने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती. दुसऱ्या दिवशी त्याचा शोध सुरू होता. दुसऱ्या दिवशी सकाळी २५ तोळे सोने एका बांधकाम ठिकाणी आणून द्यावे, अन्यथा दर्शनचा खून करण्यात येईल, असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी शहा यांच्या घरासमोर सापडली. त्यावरून पोलीस व कुटुंबीय दर्शनचा शोध घेत राहिले. तथापि, थोडय़ाच कालावधीत त्यांना दर्शनचा मृतदेह देवकर पाणंद येथील एका विहिरीमध्ये सापडला होता. त्यावरून जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. दर्शनचा खून होऊन पंधरा दिवस लोटले तरी आरोपी हाती न लागल्याने पोलिसांच्या तपासाच्या कार्यक्षमतेविषयी संशय व्यक्त जात होता. तथापि या खुनातील आरोपी पोलिसांच्या हाती लागले असल्याचे वृत्त आहे. ज्या विहिरीमध्ये दर्शनचा मृतदेह सापडला त्या जागी आरोपींना रविवारी फिरविण्यात आल्याचे सांगण्यात येते. आरोपींकडून खुनाचा कट कसा रचला. प्रत्यक्ष खुनाच्या वेळी कोणत्या हालचाली झाल्या, खुनासाठी कोणती हत्यारे वापरली याचा सविस्तर तपशील सोमवारी अधिकृतपणे दिला जाणार असल्याने पोलीस सूत्रांकडून समजते.