महाराष्ट्रात पत्रकारांसाठी संरक्षण कायदा व पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शनिवारी परभणीत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात परभणी जिल्ह्य़ासह मराठवाडय़ातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
पूर्णा येथील पत्रकार दिनेश चौधरी व त्यांच्या कुटुंबीयांवर गुटखा माफियाकडून प्राणघातक अ‍ॅसिड हल्ला झाला. दुसऱ्या दिवशी गंगाखेड येथे कांबळे नावाच्या पत्रकारास मारहाण करून त्याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. या दोन्ही घटना गंभीर आहेत. पत्रकारांवरील हल्ला प्रकरणाची दखल घेत पत्रकारांनी आज मोर्चा काढला. शनिवारी दुपारी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष किरण नाईक व कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात पत्रकार संरक्षण कायदा करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी पत्रकार चौधरी यांच्या हल्लेखोरास तातडीने अटक झाली पाहिजे तसेच कांबळे यांच्या विरोधातील खंडणीचा गुन्हा मागे घ्यावा, असे देशमुख यांनी सांगितले. या दोन्ही मागण्या मान्य न झाल्यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष चालू ठेवण्यात येणार असून ८ एप्रिल रोजी पुणे येथून मुख्यमंत्र्यांच्या वर्षां बंगल्यापर्यंत मोटरसायकलने लाँग मार्च काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी कार्याध्यक्ष किरण नाईक, जयप्रकाश दगडे, केशव घोनसे पाटील, आसाराम लोमटे आदींची भाषणे झाली. या अनुषंगाने परभणीचे पालकमंत्री प्रकाश सोळंके यांच्याबरोबर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख व किरण नाईक यांची चर्चा झाली. या कायद्यासंदर्भात मंत्रिमंडळात सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन सोळंके यांनी दिले.