रमजान ईद आज नगर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. कोठला भागातील ईदगाह मैदानात सार्वजनिक नमाज पठण करण्यात आले तसेच विविध भागातील मशिदीतुनही नमाज अदा करण्यात आली. नागरिकांनी परस्परांना शुभेच्छाही दिल्या.
ईदगाह मैदानास नुकतीच संरक्षक भिंत उभारुन सुशोभीकरण करण्यात आले आहे. परिसरास उत्साहामुळे जत्रेचे स्वरुप आले होते. नमाज पठणासाठी मोठय़ा संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते. इमाम मौलाना सईद अहमद यांनी नमाज अदा केली. परिसरात यंदा व्यावसायिकांचे ‘ईद मुबारक’चे शुभेच्छा फलक लागले गेले होते. शहरातील मुस्लिमबहुल भागातही उत्साहाचे वातावरण होते. काल रात्री चंद्रदर्शन झाल्यावर फटाके फोडण्यात आले.
ईदगाह मैदानावर शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक रावसाहेब शिंदे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा, उबेद शेख, अनंत देसाई, माजी आमदार राजीव राजळे, विक्रमसिंह पाचपुते आदी उपस्थित होते. त्यांनी नमाज पठणासाठी आलेल्या बांधवांना गुलाबपुष्प दिले. पोलीस बंदोबस्तही मोठय़ा प्रमाणावर तैनात होता.
प्रेस क्लबच्या वतीनेही ‘ईद मिलान’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक सलोख्यासाठी पत्रकारांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी यावेळी बोलताना केले. महापौर शिला शिंदे, प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार राजेंद्र थोटे, समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी, विक्रमसिंह पाचपुते, वकिल संघटनेचे अध्यक्ष शिवाजी कराळे, रफिक मुन्शी आदी उपस्थित होते. प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सुर सेख व जिल्हा पत्रकार संघाचे सहचिटणीस शकुर शेख यांनी स्वागत केले.