क्लोरोफॉर्म तोंडाला लावून महिलांचे दागिने लुटणाऱ्या टोळीस शुक्रवारी अटक करण्यात आली. १४९ ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन मोटारसायकली असा एकूण ४ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. यातील तीन आरोपींना अटक केली असून एकजण फरारी आहे.    
सुमारे दीड वर्षांपूर्वी करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील निर्जन भागामध्ये शेती काम करणाऱ्या एकटय़ा वयोवृध्द महिलांना चोरटे गाठत असत. त्यांच्या तोंडाला हातरुमालावर क्लोरोफॉर्म रसायन लावून त्यांच्या नाक व तोंडाजवळ दाबून धरीत. त्या बेशुध्द पडल्यावर त्यांच्या हातातील सोन्याच्या पाटल्या, मंगळसूत्र व कर्णफुले इत्यादी सोन्याचे दागिने कटरने कापून जबरी चोरी करीत असत. ही माहिती अजित देसाई, विनोद ढवळे, आनंदकुमार माने, विनायक चौगुले या पोलिसांना मिळाली होती.    
त्यानुसार पोलिसांच्या पथकाने संशयावरून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या तीन व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यामध्ये संतोष लिंगाप्पा जाधव (वय २८ रा. मुडशिंगी), पृथ्वीराज कचदेव पुंगावकर (वय २० रा. शिवाजी पेठ), संदीप रवींद्र सातुशे (वय २६ रा. शाहूवाडी) व फरारी असलेला विनायक सुतार (रा. पलूस, जि. सांगली)यांचा समावेश होता.     
त्यांच्याकडे बारकाईने चौकशी केली असता त्यांनी दीड वर्षांपूर्वी कोथळी (ता. करवीर), बालिंगा (ता. करवीर), इस्पुर्ली (ता. करवीर), यवलुज (ता. पन्हाळा) या गावच्या हद्दीमधील गुन्हे केल्याचे कबूल केले. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. तसेच पन्हाळा पोलीस ठाण्यातसुध्दा एक गुन्हा उघडकीस आलेला आहे.    
आरोपींकडून तपासामध्ये १४९ ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन मोटारसायकली असा ४ लाख ६० हजार रुपयांचा माल हस्तगत केलेला आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याबाबत कारवाई सुरू राहणार असून ही कारवाई पोलीस निरीक्षक पी. डी. पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे गुन्हे शोधपथकातील कर्मचाऱ्यांनी केली.