सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे कार्यालय अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या वृत्ताला दस्तुरखुद्द वनमंत्र्यांनीच पूर्णविराम दिल्याने हे कार्यालय कराडलाच होण्याबाबत शिक्कामोर्तब होऊन तथाकथित चर्चेवर आता पडदा पडला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मध्यवर्ती जिल्हा कार्यालय कराडलाच होईल, कारण चांदोली, सागरेश्वर, कोल्हापूरसाठी कराड हे मध्यवर्ती ठिकाण असल्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
डॉ. कदम यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. व जिल्हा उपवनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांना कार्यालयीन इमारतीसाठी जागा निवडण्याचे आदेशही या वेळी दिले.
डॉ. कदम म्हणाले, की कराड हे ठिकाण सर्वांसाठीच मध्यवर्ती व सोईचे आहे. चांदोली, सागरेश्वर, कोयना, बामणोली व कोल्हापूरसाठी कराडच मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाचे कार्यालय येथेच होईल. या वेळी त्यांनी डॉ. रामास्वामी, जिल्हा उपवनसंरक्षक प्रवीण यांना कार्यालयासाठी येथे जागा आहे का, याची विचारणा केली. त्या वेळी विजयनगरला वन विभागाच्या तपासणी नाक्यानजीक जागा असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी नमूद केले. त्यावर वनमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा उपवनसंरक्षक यांना व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयाची इमारत बांधण्याच्या दृष्टीने वन विभाग किंवा शासनाच्या जागा कोठे आहेत ते तपासा, असे आदेश दिले.