दररोज सात लाखांहून अधिक प्रवाशांची ये-जा होणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकामधील सुरक्षा व्यवस्था सध्या केवळ देखाव्याच्या रूपातच दिसत आहे. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले धातूशोधक दरवाजे तसेच संशयास्पद वस्तूंची तपासणी करणारी क्ष-किरण यंत्रे एकीकडे तर प्रवाशांची ये-जा दुसरीकडे, असे चित्र सध्या दिसत आहे. दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर स्थानकामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव ही व्यवस्था तयार करण्यात आली असली, तरी त्याचा उपयोग मात्र काडीचाही होताना दिसत नाही. हा सर्व प्रकार म्हणजे मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
सध्या स्थानकाच्या पश्चिम तसेच पूर्व या दोन्ही भागांच्या प्रवेशद्वाराजवळ धातूशोधक दरवाजे आणि क्ष-किरण यंत्रे उभारण्यात आली आहेत. पण यातील गमतीचा भाग म्हणजे पश्चिमेकडे फलाट १च्या प्रवेशद्वाराच्या एका कोपऱ्यात हा देखावा उभारण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याचे काहीही देणे-घेणे नसते. हे दरवाजे नेहमीच ओस पडलेले असतात. प्रवाशांकडील संशयास्पद वस्तूंची तपासणी करण्यासाठी यापूर्वी येथे असलेले पोलीस तसेच गृहरक्षक दलाचे जवान सध्या कोपऱ्यात उभ्या करण्यात आलेल्या या धातूशोधक दरवाजे व क्ष-किरण यंत्रांजवळ बसलेले असतात. त्यामुळे त्यांचा ना प्रवाशांशी संबंध येतो ना संशयास्पद वस्तूंची तपासणी करण्यासाठी. या सर्वावर कडी करणारा प्रकार म्हणजे केवळ फलाट एकच्या जवळच ही यंत्रणा उभारण्यात आली असून अन्य चार ते पाच मार्गानी प्रवासी स्थानकात ये-जा करू शकतो. यामध्ये फलाट दोनवर एखादा प्रवासी तीन ठिकाणांहून येऊ शकतो. या तिन्ही ठिकाणी अशी कोणतीही व्यवस्था उभारण्यात आलेली नाही.
असाच प्रकार पूर्व भागाकडेही दिसतो. पूर्वेकडे फलाटावर येण्यासाठी तीन ते चार मार्ग आहेत, पण केवळ एकाच मार्गावर हा देखावा उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणी ना पोलीस असतो ना गृहरक्षक दलाचा जवान. दिवसात एखादा प्रवासीच या यंत्रणेमधून स्थानकात प्रवेश करताना दिसतो. लाखो रुपये खर्चून ही यंत्रणा अत्यंत ढिसाळ तसेच अनियमित पद्धतीने उभी केल्याने प्रवाशांमध्ये आश्चर्य तसेच संतापही व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत ठाणे रेल्वे स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर हा प्रकार झाल्याचे मान्य करतानाच यामध्ये सुधारणा करण्यात येईल असे सांगितले.
काय करणार कर्तव्य बजावतोय!
धातूशोधक दरवाजे तसेच क्ष-किरण यंत्रे उभारण्यात आली आहेत. त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या जागेवर काहीवेळा प्रवासी तसेच त्यांच्या बॅगा ठेवलेल्या पाहावयास मिळतात. क्वचित प्रसंगी तेथे जर पोलीस आलाच तर या बॅगा काढल्या जातात. याबाबत विचारले असता तेथे असलेल्या एका महिला पोलिसाने सांगितले की, साहेबांनी आम्हाला येथे डय़ुटी करावयास सांगितली आहे, पण येथे प्रवाशांचाच संबंध येत नाही. पण आम्हाला आमचे कर्तव्य बजावावेच लागेल.
धातूशोधक दरवाजे सदोष
पूर्वेकडे उभारण्यात आलेल्या तिन्ही धातूशोधक दरवाजांनी आताच मान टाकली असल्याचे चित्र पाहावयास मिळते. चुकून एखादा प्रवासी त्यामधून गेला तरी त्या दरवाजामधून कोणताही संदेश आवाजाच्या रूपात येत नाही. अवघ्या १५ दिवसांपूर्वीच उभी करण्यात आलेली ही यंत्रणा किती सदोष आहे हे यामधून सिद्ध होते.
बंदुकधारी पोलीसही गायब
२६ नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यानंतर ठाण्यासह सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर एक कायमस्वरूपी बंदुकधारी पोलीस नियुक्त करण्यात आला होता. वाळूच्या पोत्यांचा बंकरसारखा वापर करून हा पोलीस तेथे नियुक्त करण्यात आला होता, पण हा सर्व उत्साह चार ते पाच महिन्यांतच मावळला. आता तेथे फक्त वाळूच्या पोत्यांचेच दर्शन होते.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…