महानगरपालिकेच्या मावळत्या उपायुक्त स्मिता झगडे यांना बुधवारी निरोप देण्यात आला. महापौर शीला शिंदे व आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
 झगडे यांची पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक संचालकपदी बदली झाली आहे. गेले दोन वर्षे त्या मनपात उपायुक्तपदी (कर) कार्यरत होत्या. शिंदे यांनी या वेळी  झगडे यांच्या कामाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, मनपात मी तसेच उपमहापौर, स्थायी समितीच्या तत्कालीन सभापती, महिला बालकल्याण समितीच्या सभापती-उपसभापती अशा आम्ही सर्वानी पदभार स्वीकारला त्याचवेळी झगडे येथे उपायुक्त म्हणून रुजू झाल्या. त्यांच्या येण्याने मनपात ख-या अर्थाने महिलाराज स्थापन झाले होते. घरपट्टी वसुलीचे तुलनेने जिकिरीचे परंतु मनपाच्या दृष्टीने आर्थिक उत्पन्नाची म्हणून महत्त्वाची असलेली जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली असे त्या म्हणाल्या. आयुक्तांनी या वेळी बोलताना स्वत:च्या गावात काम करणे ही तारेवरची कसरत असते, ती  झगडे यांनी कार्यक्षमपणे पेलली असे सांगितले. त्यांच्या काळात उच्चांकी वसुली झाली असे ते म्हणाले.
झगडे यांनी या वेळी बोलताना नगरला खूप  शिकता आले असे सांगितले. जन्मगावी रुजू होताना नगरकरांच्या अपेक्षांचे ओझे होते, मात्र पदाधिकारी व अधिका-यांच्या सहकार्याने ब-याच गोष्टी करता आल्या असे त्या म्हणाल्या. उपमहापौर गीतांजली काळे, स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती किरण उनवणे आदींची या वेळी भाषणे झाली. उपायुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी प्रास्तविक केले.