सध्या प्रगतिपथावर असलेल्या शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी (फेज २) मुळा धरण ते एमआयडीसीपर्यंत स्वतंत्र एक्सप्रेस फीडर देण्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर हजारे यांनी मान्य केले. त्यासाठी स्वतंत्र दरपत्रक लागू करण्याचेही त्यांनी मान्य केले.
महापौर संग्राम जगताप यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात शुक्रवारी महापालिकेत आमदार अरुण जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त बैठक झाली. या बैठकीत मनपाच्या या मागण्या मान्य करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी, उपमहापौर सुवर्णा जगताप, महावितरणचे कार्यकारी अभियंता गोरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, मनपातील राष्ट्रवादीचे गटनेते समद खान आदी यांच्यासह मनपाचे अन्य अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
संग्राम जगताप, आयुक्त कुलकर्णी आदींनी नुकतीच शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर आज बोलावलेल्या बैठकीत आमदार जगताप यांनी या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी वाढीव वीजभार आवश्यक असल्याचे बैठकीत सांगितले. त्याकडे महावितरणचे लक्ष वेधून घेताना केवळ योजना पूर्ण करून चालणार नाही, ती सुरळीतपणे चालवण्यासाठी मुळा धरणासह विळद पंपिंग स्टेशन, जलशुध्दीकरण केंद्र व एमआयडीसीतील केंद्राला पुरेशा दाबाने विनाखंड वीजपुरवठा होणे गरजेचे आहे हे स्पष्ट करून त्यादृष्टीने उपाययोजना करण्याची सूचना आमदार जगताप यांनी केली.
मनपाची ही मागणी मान्य करताना महावितरणने मुळा धरणासह विळद व एमआयडीसीपर्यंत वाढीव विजेचा भार देण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी स्वतंत्र एक्सप्रेस फीडर टाकण्यासही हजारे यांना मान्यता देऊन मनपाच्या मागणीप्रमाणे त्यासाठी एकत्रित अंदाजपत्रक देण्याचेही या बैठकीत ठरले. याप्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर शहराच्या पाणीपुरवठय़ात मोठी सुधारणा होऊन सर्व भागात पुरेशा दाबाने पुरेसे पाणी नगरकरांना मिळेल असा विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.