सुमारे १२० सोमाली चाच्यांविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात सहा देशांचे ९० नागरिक हे महत्त्वाचे साक्षीदार आहेत. मात्र सतत समन्स बजावूनही हे साक्षीदार हजर न राहिल्याने या खटल्याला खीळ बसली आहे. याच कारणास्तव गेल्या पाच महिन्यांपासून हा खटला ‘जैसे थे’ स्थितीत आहे. विशेष म्हणजे त्यांना हजर राहण्याबाबत जेव्हा जेव्हा समन्स बजावण्यात येते, तेव्हा त्या मुद्दय़ाला बगल देऊन त्यांचा प्रवास, राहण्याखाण्याच्या खर्चाचा मुद्दा संबंधित देशांकडून उपस्थित करण्यात येतो.  
पाकिस्तान, मोझाम्बिक, थायलंड, इराण, म्यानमार आणि इंडोनेशिया या सहा देशांचे ९० नागरिक या खटल्यातील प्रमुख साक्षीदार आहेत. मात्र खटल्यासाठी त्यांना हजर करण्याबाबत या सहाही देशांकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे सरकारी वकिलांकडून न्यायालयाला सांगण्यात आले आहे. जानेवारी ते एप्रिल २०११ या कालावधीत सोमाली चाच्यांच्या तावडीतून भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने या परदेशी नागरिकांची सुटका केली होती.
साक्षीदारांना साक्षीसाठी भारतात पाठविण्याबाबत पोलिसांनी या देशांच्या दूतावासाकडे या महिन्यातही दोन वेळा संपर्क साधला आहे. मात्र कुठल्याही प्रकारचे उत्तर दिलेले नाही, अशी माहिती सरकारी वकील रणजीत सांगळे यांनी दिली. चाच्यांच्या तावडीतून सुटका करून या परदेशी साक्षीदारांना त्यांच्या देशाच्या हवाली करण्यात आले. साक्षीदारांची गरज असेल तेव्हा त्यांना भारतात पाठविण्यात येईल, असे आश्वासन सहाही देशांनी दिले होते. हे साक्षीदार या खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार असून खटल्यासाठी त्यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगळे यांनी सांगितले.