पाणी व वीजदरात केलेल्या अन्यायकारक दरवाढीच्या विरोधात नगरच्या ‘असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज’ (आमी) संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बेसुमार दरवाढीबद्दल राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि. १०) नगरमधील उद्योजक काळय़ा फिती लावतील, तसेच एमआयडीसी व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालणार आहेत.
आमीचे अध्यक्ष अशोक सोनवणे व उपाध्यक्ष दौलत शिंदे यांनी ही माहिती दिली. सर्व शहरांतील उद्योजकांनी एकाच वेळी आंदोलन करावे, तसेच त्यात सर्व उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही संघटनेचे सहसचिव राजेंद्र कटारिया यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
औद्योगिक क्षेत्रासाठीच्या वीजदरात गेल्या सप्टेंबरपासून २५ टक्के वाढ करण्यात आली, तसेच एमआयडीसीने पाणीदरात गेल्या एप्रिलपासून २० टक्के दरवाढ केली, पुन्हा सध्याच्या डिसेंबरपासून पाणीदरात ४० टक्के वाढ केली, ही वाढ अन्यायकारक आहे, यामुळे नवीन उद्योजक राज्यात येण्यास उत्सुक नाहीत व सध्या आहेत ते उद्योगही राज्याबाहेर स्थलांतरित होतील, नगरमधील उद्योजकांची अवस्था तर आणखीनच बिकट होणार आहे, याकडे आमीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकात लक्ष वेधण्यात आले आहे.
दरवाढीबद्दल राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी उद्योजक मंगळवारी एमआयडीसीचे उपकार्यकारी अभियंता व्ही. सी. सुतार व एस. एस. जगताप यांना दुपारी ३ वाजता घेराव घालून धरणे धरतील. वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता हजारे यांनाही घेराव घालतील, तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांना एसएमएस, पत्र पाठवून निषेध करून दरवाढीस स्थगिती मिळवण्याची मागणी करणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.