आनंदऋषी रुग्णालय व यश पॅलेस परिसरातील सांडपाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन येथील ड्रेनेजलाईनचे काम आजच पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महापौर शीला शिंदे यांनी दिली. पुणे राज्यमार्गावरील क्रॉसिंगच्या कामाला व त्यादृष्टीने वाहतुकीच्या नियोजनालाही ताडीने मंजुरी घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
महापौरांसह आमदार अनिल राठोड, मनपा आयुक्त विजय कुलकर्णी, शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी आदींनी बुधवारी या कामाची पाहणी करून तातडीने ते पर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नगरसेवक संजय चोपडा, संभाजी कदम, नितीन जगताप, माजी नगरसवेक अनिल शिंदे, मेहुलकुमार भंडारी आदी या वेळी उपस्थित होते.
 शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या परिसरात सांडपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आहे. येथील जुनी ड्रेनेजलाईन नादुरुस्त झाल्याने परिसरातील मैलामिश्रित सांडपाणी नागरिकांच्या घरात येते. नळालाही हे पाणी येत असून तातडीने त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. बडीसाजन मंगल कार्यालयातही या सांडपाण्याचे तळे झाले आहे. या घाणीचा निचरा करण्यासाठी यश पॅलेस व उदयनराजे हॉटेलपासून मोठी ड्रेनेजलाईन टाकण्यात येत असून हे पाणी सीना नदीत सोडण्यात येणार आहे. यश पॅलेसजवळच त्यासाठी राज्यमार्ग क्रॉस करणे गरजेचे होते. त्यासाठी संबंधित विभागांशी तातडीने पत्रव्यवहार करून ही परवानगी मिळवण्यात आली असून त्यादृष्टीने रहदारीचेही नियोजन संबंधित विभागाने केल्याची माहिती शिंदे यांनी दिली.